विक्रम शिंदे : राजगड न्युज
भोर: पोलीस पाटील रिक्त पदांच्या भरतीबाबत ८ ऑक्टोबर रोजी घेण्यात आलेल्या लेखी परीक्षेत पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी आज जाहीर करण्यात आली त्यामध्ये एकूण २०९ उमेदवार पात्र झाले असून पात्र उमेदवारांच्या तोंडी मुलाखती पंचायत समिती सभागृह,भोर येथे १२ ऑक्टोबर रोजी सकाळी ७.३० वाजेपासून आयोजित करण्यात आल्या आहेत.
मुलाखती वेळी येताना पात्र झालेल्या उमेदवारांनी मुलाखतीस येताना इयत्ता दहावी व बारावी उत्तीर्ण असल्याचे गुणपत्रक व मंडळाचे प्रमाणपत्र, पदवी व पदव्युत्तर परीक्षा उत्तीर्ण असल्याचे गुणपत्रक व प्रमाणपत्र, महाराष्ट्र कॅडेट कॉर्प्स (एमसीसी), राष्ट्रीय छात्र सेना (एनसीसी), राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) प्रमाणपत्र, एमएससीआयटी उत्तीर्ण प्रमाणपत्र, खेळाचे प्राविण्य प्रमाणपत्र, तालुका, जिल्हा, राज्य, राष्ट्रीयस्तर आदी संबंधित मुळ कागदपत्रे व त्याची प्रत्येकी एक साक्षांकित प्रत सोबत आणावी.
प्रथमतः कागदपत्रांची तपासणी करण्यात येणार असून त्यानंतर मुलाखत घेतली जाणार आहे. परीक्षेचा अंतिम निकाल हा लेखी परीक्षा व मुलाखतीचे गुण एकत्रित करून घोषित करण्यात येणार आहे, अशी माहिती भोर उपविभागाचे उपविभागीय अधिकारी, तथा उपविभागीय दंडाधिकारी राजेंद्र कचरे यांनी दिली आहे.