पाटसः येथील वरवंडमधील एका घरात यवत पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात तब्बल ११ लाख २ हजार ६४० रुपयांचा अवैध गुटखा मिळून आला आहे. खोलीत पोतीच्या पोतीमध्ये अवैध गुटखा ठेवण्यात आला होता. या प्रकरणी पोलिसांनी रेवणनाथ हरीभाऊ गोसावी याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. गोसावी याच्या घरासमोर असणाऱ्या बंद खोलीत गुटखा, पान मसाला, सुगंधित तंबाखू अशा विविध प्रकारची गुटखा विक्रीचा माल पोलिसांनी कारवाईत जप्त केला आहे.
ही कारवाई पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विजय कोल्हे, उत्तम कांबळे, पोलीस हवालदर रविंद्र गोसावी, गुरुनाथ गायकवाड, हिरालाल खोमणे, पोलीस नाईक निखील रणदिवे, पोलीस अंमलदर शुभम मुळे, दत्तात्रय टकले, मोहन भानवसे, महिला अंमलदार हेमलता भोंगळे, प्रतीक्षा हांडगे आदींच्या पथकाने केली आहे.
यवत, केडगाव भागात अवैध गुटख्याची खुलआम विक्री?
यवत पोलीस ठाण्याच्या हद्दीतील यवत आणि केडगाव या ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणात बेकायदा गुटख्याचा साठा करून त्याची खुल्याआम पद्धतीने विक्री केली जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मात्र यावर यवत पोलिसांनी कोणत्याही प्रकारची कारवाई केली नसल्याचे बोलले जात आहे. यवत, केडगाव आणि वरवंड या ठिकाणी छुप्या पद्धतीने अवैध गुटखा मोठ्या प्रमाणावर विक्रीसाठी आणला जातो. या गुटख्यांची पोतीच्या पोती साठवून ठेवली जातात. त्यानंतर या गुटख्याची परिसरातील किराणा मालाची दुकाने आणि पान टपऱ्यांमध्ये खुलेआम विक्री केली जाते. मात्र, याकडे पोलिसांचे दुर्लक्ष होत असल्याचे बोलले जात आहे.