भोर (प्रतिनिधी) | स्वातंत्र्यानंतर 78 वर्षांनीही भोर तालुक्यातील काही डोंगरी वस्ती रस्त्याच्या मूलभूत सुविधेपासून वंचित असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. भोर तालुक्यातील म्हसरबुदुक ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या शिंदेवस्ती येथे आज सकाळी पॅरेलेसचा झटका आलेल्या 90 वर्षीय वृद्धेस रस्त्याअभावी डोलीत टाकून तीन किलोमीटर पायपीट करत रुग्णालयात पोहोचवण्यात आले.
शिंदेवस्तीतील जाईबाई कोंडीबा शिंदे (वय 90) यांना सकाळी 9 वाजता अचानक पक्षाघाताचा झटका आला. मात्र, त्यांच्या वस्तीकडे जाणारा रस्ता पूर्णतः कच्चा असून सध्या पावसाळ्यात चिखलमय झालेला आहे. त्यामुळे कोणतेही वाहन तिथपर्यंत पोहोचू शकत नाही. अशा परिस्थितीत त्यांच्या नातवंडांनी व ग्रामस्थांनी जाईबाई यांना डोलीसारख्या डालात बसवून चिखल व डोंगर उतारातून तब्बल दीड तास चालत म्हसरबुदुक गावात आणले.
त्यानंतर खाजगी वाहनाच्या सहाय्याने त्यांना भोर उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. सुदैवाने त्यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याचे समजते.
या घटनेने डोंगरी भागातील रस्त्यांअभावी नागरिकांना कोणत्या संकटांना सामोरे जावे लागते, हे पुन्हा अधोरेखित झाले आहे. म्हसरबुदुक ग्रामपंचायतीचे सदस्य दिनेश बबन शिंदे यांची जाईबाई शिंदे या आजी आहेत. त्यांनी सांगितले की, “दरवर्षी पावसाळ्यात आम्हाला याच परिस्थितीला सामोरे जावे लागते. रस्ता पूर्णपणे निसरडा व बंद होतो. कोणतेही वाहन वस्तीत येत नाही. आज आम्ही आज्जीला डोलीत टाकून आणलं, उद्या कोणत्याही रुग्णाचा जीवही जाऊ शकतो.”
शिंदेवस्तीमध्ये सुमारे 25 घरे आहेत. मात्र, तेथील लोक रस्त्याविना जगण्याची लढाई दरवर्षी लढत आहेत. विशेष म्हणजे भाटघर धरण क्षेत्र, निरादेवघर, रायरेश्वर किल्ल्यावरील धानवली आणि अनेक दुर्गम वस्त्यांमध्ये देखील हीच स्थिती आहे.
या पार्श्वभूमीवर म्हसरबुदुकचे सरपंच एकनाथ म्हसुरकर यांनी सांगितले की, “शिंदेवस्तीला कायमस्वरूपी रस्ता उपलब्ध व्हावा यासाठी प्रशासनाने तातडीने पुढाकार घ्यावा. नागरिकांचे जीव धोक्यात घालून आरोग्यसेवा पोहोचवावी ही शोकांतिका असून, हा रस्ता पक्क्या स्वरूपात करण्याची आमची मागणी आहे.”
या घटनेमुळे प्रशासनाच्या दिरंगाईविषयी संताप व्यक्त केला जात असून, संबंधित विभागाने तत्काळ लक्ष देऊन रस्ता मंजूर करावा, अशी जोरदार मागणी नागरिकांतून होत आहे.