भोर: शहरात येणाऱ्या गणेशोत्सव काळात शांततापूर्ण वातावरण राखण्यासाठी पोलीस प्रशासनाने कडक कारवाईला सुरुवात केली आहे. शहरात कायदा व सुव्यवस्था बिघडवणाऱ्या ११ जणांना गणपतीच्या दिवशी एक दिवसासाठी हद्दपार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
पोलिसांच्या मते, हे आरोपी अवैध दारू विक्री करणे आणि मारामारीच्या घटनांमध्ये सहभागी असल्याचे आढळून आले आहे. त्यांच्यामुळे शहरात अनेकदा वादविवाद आणि तणाव निर्माण होत होता. यामुळे गणेशोत्सव उत्सवात कोणत्याही प्रकारची अशांतता निर्माण होऊ नये यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे सासवड पुणे ग्रामीण यांच्या आदेशानुसार, भोर पोलीस स्टेशनने या ११ जणांना नोटीस बजावली आहे. यामध्ये अविनाश राजेंद्र लोणकर , प्रकाश किसन नवघणे, दत्तात्रय शंकर शेटे, लक्ष्मण राजाराम दळवी, सनी सुरेश बारगळे, गणेश ज्ञानोबा कंक, अमित प्रकाशसिंग तारू, सागर दशरथ धोंडे, हनुमंत सोपान मळेकर, मंगेश शंकर ओतारी व कुणाल धुमाळ यांचा समावेश आहे.
पोलीस निरीक्षक अण्णा पवार यांनी स्पष्ट केले की, कोणत्याही प्रकारचा कायदा भंग करणाऱ्या व्यक्तीवर कठोर कारवाई करण्यात येईल. या निर्णयामुळे शहरात गणेशोत्सव उत्सव शांततेत आणि सुरक्षिततेत पार पडेल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.


















