भोर ः भोर नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा अंतिम दिवस सोमवार (दि. १७ नोव्हेंबर) अत्यंत उत्साहात पार पडला. पहिल्या सात दिवसांत केवळ दहा अर्ज दाखल झाले होते. मात्र, अंतिम दिवशी प्रमुख पक्षांनी केलेल्या शक्तिप्रदर्शनामुळे नगरपालिकेच्या परिसरात दिवसभर उत्साह, नारळफोडी, बॅनर-झेंडे आणि घोषणा यांचा माहोल अनुभवायला मिळाला.
निवडणूक निर्णय अधिकारी प्राजक्ता घोरपडे आणि सहाय्यक निर्णय अधिकारी गजानन शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, नगराध्यक्ष पदासाठी ८ तर नगरसेवक पदासाठी तब्बल ११५ अर्ज दाखल झाले आहेत.
या निवडणुकीत भोर नगरपरिषद क्षेत्रातील १ नगराध्यक्ष आणि २० नगरसेवकांची निवड होणार आहे. १० नोव्हेंबरपासून नगरपालिका सभागृहात अर्ज स्वीकारण्यास सुरुवात झाली होती. सुरुवातीला संथ गतीने अर्ज दाखल झाले असले तरी शेवटच्या दिवशी दोन्ही प्रमुख राजकीय पक्षांनी उमेदवारांसह मोठ्या जल्लोषात मिरवणुका काढून अर्ज दाखल केले.
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांनी आमदार शंकर मांडेकर यांच्या उपस्थितीत भोर बसस्थानकापासून भव्य मिरवणूक काढत अर्ज दाखल केले. ढोल-ताशांच्या गजरात कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला पोहोचला होता. त्याचप्रमाणे भारतीय जनता पक्षाने माजी आमदार संग्राम थोपटे यांच्या नेतृत्वाखाली शिवतीर्थ चौपाटी येथून मोठे शक्तीप्रदर्शन करीत उमेदवारांचा अर्ज दाखल सोहळा पार पाडला. दोन्ही पक्षांच्या शक्तिप्रदर्शनामुळे शहरातील राजकीय वातावरण तापले होते.
नगराध्यक्ष पदासाठी भाजपकडून संजय जगताप, नूतन जगताप आणि गणेश ज्ञानोबा पवार यांनी अर्ज दाखल केले आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून रामचंद्र (नाना) आवारे आणि ऋषभ रामचंद्र आवारे यांनी उमेदवारी दाखल केली आहे. शिवसेनेतर्फे नितीन सोनवले मैदानात उतरले असून कविता खोपडे यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल करून स्पर्धा आणखी चुरशीची केली आहे.
मंगळवारी (दि. १८ नोव्हेंबर) अर्ज छाननी प्रक्रिया पार पडणार असून कोणते अर्ज वैध ठरणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अंतिम यादी जाहीर झाल्यानंतर प्रत्यक्ष लढतीचे चित्र स्पष्ट होणार असून भोर नगरपरिषदेची निवडणूक अतिशय चुरशीची होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.


















