भोर (ता. ६) : भोर विधानसभेत गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या ‘आजी-माजी’ श्रेयवादाच्या लढाईला शनिवारी नवे वळण मिळाले. भोरचे विद्यमान आमदार शंकर मांडेकर यांनी नाव न घेता माजी आमदार संग्राम थोपटे यांच्यावर जोरदार प्रहार केला. “आता तुम्ही लोकप्रतिनिधी नाहीत, राज्यसभेवर नाहीत, विधानपरिषदेत नाहीत, किंबहुना कुठल्याही पक्षाचे प्रवक्ते नाहीत. तीस-चाळीस वर्ष सत्ता असूनही कामे करता आली नाहीत म्हणून लोकांनी मला निवडून दिले. त्यामुळे फुकटचे श्रेय घेऊ नका,” अशा शब्दांत मांडेकर यांनी थोपटे यांना फैलावर घेतले.
भोरमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना आमदार मांडेकर म्हणाले, “एखादे निवेदन दिले, बैठक घेतली आणि लगेच निर्णय झाला असे नसते. निधीची तरतूद करणे व तो खेचून आणणे हे विद्यमान आमदाराचे काम आहे. पडलेल्या आमदाराला असा अधिकार नसतो. इतकी वर्ष सत्ता असूनही मतदारसंघात विकास घडवून आणता आला नाही. आता स्थानिक स्वराज्य संस्था डोळ्यासमोर ठेवून पळापळ केली जात आहे. इतके आधीच केले असते तर लोकांनी मला निवडून दिले नसते.”
थोपटे यांनी भाजपमध्ये प्रवेश करून विविध विकासकामांचे श्रेय घेतल्याचा मुद्दा उपस्थित करत मांडेकर पुढे म्हणाले, “ज्या गावाने कायम तुम्हाला आघाडीवर ठेवले, तिथे साधे रस्तेसुध्दा करता आले नाहीत. मी दिलेल्या आश्वासनाप्रमाणे एका वर्षात भोरमध्ये बसेस आणल्या, कोट्यवधींचा निधी मंजूर केला. गायरानच्या प्रश्नावर आम्हीच पाठपुरावा केला आणि तो पूर्णत्वास नेऊ. लोकांसाठी मी पळालो म्हणून लोकांनी मला निवडून दिले आहे, त्यामुळे केवळ श्रेय लाटण्याचा केविलवाणा प्रयत्न करू नये.”
यावेळी महायुती असूनही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वतंत्रपणे लढण्याचे संकेत वरतून मिळाल्याचेही मांडेकरांनी स्पष्ट केले. “सर्व ठिकाणी घड्याळच दिसणार आहे. तुम्ही ज्या पक्षात गेला आहात, त्या पक्षाच्या नेत्यांचे फोटो तुमच्या फ्लेक्सवर नसतात. उलट भाजपातील अनेक जुने पदाधिकारी तुमच्यामुळे अस्वस्थ झाले आहेत. हे लक्षात ठेवा,” असा सल्लाही त्यांनी थोपटे यांना दिला.
पत्रकार परिषदेस रणजीत शिवतरे, विक्रम खुटवड, चंद्रकांत बाठे, यशवंत डाळ, नितिन थोपटे, विलास वरे, सुनील भेलके, अविनाश गायकवाड, बंटी कोंडे, प्रविण जगदाळे आदी मान्यवर उपस्थित होते.