भोर: भोंगवलीतून अवैध गॅस सिलेंडर विक्री होत असल्याची बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर भोर पुरवठा विभागाकडून त्या ठिकाणी पंचनामा करण्यात त्याचे कारवाईचे पत्र देखील भारत गॅस कडे पाठविण्यात आले मात्र, अद्याप या विक्रेत्यांवर भारत गॅस कंपनीकडून कोणतीही कारवाई झाली नाही.
भोंगवली ता. भोर येथील श्री. शिरगावकर हे भारत गॅस कंपनीचे अधिकृत उपवितरक आहेत. त्यांनी 7 सिलेंडर राहत्या घरात ठेवून वितरण करण्यासाठी कंपनीशी करार केला होता. मात्र, पुरवठा निरीक्षक भोर यांनी तपासणी केली असता त्यांना शिरगावकर यांच्या राहत्या घराच्या अंगणात 5, ग्रामपंचायतीच्या जागेत 7 आणि शेजारील एका घरात 8 (एकूण 20) रिकामे सिलेंडर आढळून आले. याव्यतिरिक्त, शिरगावकर यांनी भाड्याने घेतलेल्या दुसऱ्या घरात 8 रिकामे आणि 3 भरलेले असे 11 गॅस सिलेंडर साठवून ठेवले होते.
अशा प्रकारे, शिरगावकर यांनी एकूण 31 गॅस सिलेंडर अनाधिकृतपणे वेगवेगळ्या ठिकाणी साठवून ठेवले होते. हे सिलेंडर कंपनीच्या नियमांचे उल्लंघन करत, अत्यंत धोकादायक परिस्थितीत ठेवले गेले होते. सभोवताल घरे आणि माध्यमिक विद्यालय असल्याने यामुळे गंभीर अपघाताची शक्यता होती.
पुरवठा विभागाने या प्रकरणी त्वरित कारवाई करण्याची मागणी भारत पेट्रोलियम कॅर्पोरेशन लिमिटेड, जनरल थिमय्या रोड, सहजानंद कॉम्प्लेक्स, कॅम्प, पुणे- 01 यांच्याकडे केली.
परंतु भारत गॅस पेट्रोलियम अधिकाऱ्यांनी या प्रकरणी उडवाउडवी उत्तरे दिली आहेत. अधिकाऱ्यांनी सांगितले की, त्यांना या विक्रेत्यांबद्दल तक्रार मिळाली नाही मात्र, पुरवठा विभाग यांच्याकडून त्यांना पत्र पाठविण्यात आले असून गॅस एजन्सी यांच्याकडून देखील त्यांना पत्र देण्यात आल्याचं देखील सांगण्यात आले.
मिळालेल्या माहितीनुसार, त्या अधिकाऱ्यांना या बाबत माहिती असून देखील उडवाउडवीची उत्तरे दिली जातात. आणि विशेष म्हणजे या अधिकाऱ्यांकडून गॅस एजन्सीची तपासणी देखील झाल्याची माहिती मिळाली आहे परंतु या अधिकाऱ्यांच्या उत्तराने पाठीशी घालण्याचे काम सुरू आहे हे देखील स्पष्ट होत आहे. यामुळे नागरिकांमध्ये अधिकाऱ्यांच्या कामावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. काही नागरिकांचा असा आरोप आहे की, अधिकारी या अनधिकृत गॅस वितरकांना पाठीशी घालत आहेत.या प्रकरणावर त्वरित कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
त्या गॅस वितरकाचे पुन्हा गॅस विक्री सुरू?
पुरवठा विभागाने पंचनामा करून सुमारे १५ दिवस होऊन गेले व त्या ठिकाणी अवैध गॅस सिलेंडर देखील मिळून आले परंतु त्या गॅस वितारकाकडून जैसे थे गॅस सिलेंडर विक्री सुरू आहे.
तहसीलदारांच्या पत्राला केराची टोपली?
पुरवठा विभागाने त्वरित कारवाई करत त्या गॅस वितरकावर कारवाई करण्याचे आदेश दिले होते त्या संबंधी अधिकाऱ्यांना या बाबत सूचित देखील करण्यात आले होते परंतु या सर्व गोष्टीना दुजोरा देत पत्र मिळालेच नाही या बाबतची उत्तरे संबंधित अधिकाऱ्यांकडून देण्यात आल्यामुळे तहसीलदार भोर यांच्या पत्राला केराची टोपली दाखवली की काय अशी चर्चा मात्र जोर धरू लागली आहे.
या बाबत भारत गॅसचे अधिकारी प्रकाश मिणा यांना माहिती घेण्या करिता संपर्क केला असता आम्हाला कोणत्याही प्रकारचे पत्र मिळाले नसून आम्हाला या बाबत कल्पना नाही अश्या प्रकारची उत्तरे देण्यात आली.