भोर : महाराष्ट्रातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी अखेर राज्य निवडणूक आयोगाने तयारी सुरू केली आहे. सुमारे पावणेचार वर्षाच्या प्रतीक्षेनंतर या निवडणुका होण्याचा मार्ग सुकर झाला आहे. राज्य निवडणूक आयोगाने मंगळवारी (२३ सप्टेंबर) ३२ जिल्हा परिषदा आणि ३३६ पंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठी मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर केला. यामध्ये पुणे जिल्हा परिषद आणि पुणे जिल्ह्यातील १३ पंचायत समित्यांचा समावेश आहे. येत्या ८ ऑक्टोबर २०२५ रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध होणार आहे.
या निवडणुकीसाठी १ जुलै २०२५ पर्यंतची विधानसभेची मतदार यादी ग्राह्य धरली जाणार आहे. प्रारूप मतदार यादीवर गाव पुढाऱ्यांना आणि राजकीय पक्षांना ८ ऑक्टोबर ते १४ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत हरकती आणि सूचना नोंदवता येणार आहेत. हरकतींचे निराकरण करून २७ ऑक्टोबर २०२५ रोजी मतदान केंद्रनिहाय अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाईल. स्थानिक स्वराज्य संस्था डिसेंबर अखेर निवडणुका घेण्याचे स्पष्ट केले आहेत.महाराष्ट्रातील २६ जिल्हा परिषदा आणि २८६ पंचायत समित्यांचा कार्यकाल अनुक्रमे २० मार्च आणि १३ मार्च २०२२ रोजी संपुष्टात आला होता. त्यानंतर आणखी सहा जिल्हा परिषदा आणि ५० पंचायत समित्यांचा कार्यकालही संपला आहे. गेल्या काही वर्षापासून या सर्व पंचायतराज संस्थांवर प्रशासकराज सुरू आहे.