राजगड : निगडे–मोसे (ता. राजगड) परिसरातील राजकारणात मोठा बदल घडून आला असून राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाला जोरदार धक्का बसला आहे. आमदार संग्राम थोपटे यांच्या नेतृत्वाखाली निगडे–मोसे गावातील अनेक तरुणांनी भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर प्रवेश केला आहे. या प्रवेशामुळे परिसरातील राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे स्पष्टपणे दिसून येत आहेत.
माजी जिल्हा परिषद सदस्य अमोल नलावडे यांच्या गटातील निगडे–मोसे गावातील तरुणांनी राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम ठोकत भाजपमध्ये प्रवेश केला. या निर्णयामुळे स्थानिक पातळीवर चर्चांना उधाण आले असून भाजपच्या संघटनात्मक ताकदीत लक्षणीय वाढ झाली आहे. युवकांचा वाढता कल भाजपकडे असल्याचे या प्रवेशातून स्पष्ट झाले आहे.
भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्या तरुणांमध्ये प्रसाद मोरे, विजय मोरे, विशाल कोकाटे, ऋषिकेश कोकाटे, अजय नलावडे, चेतन नलावडे, शंकर पवार, प्रवीण नलावडे, निवृत्ती चव्हाण, मनीष नलावडे, संकेत नलावडे, केतन नलावडे, शरद नलावडे, आदित्य नलावडे, विकास पवार, कालीदास पासलकर, अनिकेत नलावडे, विठ्ठल नलावडे, अभिषेक मानवर, गणेश नलावडे आणि संतोष माने यांचा समावेश आहे.
भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्या तरुणांनी केंद्र व राज्य सरकारच्या विकासात्मक योजना, पायाभूत सुविधा, युवकांसाठी रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी तसेच भाजपची विकासाभिमुख भूमिका यामुळे आपण प्रभावित झाल्याचे सांगितले. “विकास हाच आमचा अजेंडा असून तो प्रभावीपणे राबवण्याची क्षमता भाजपमध्ये आहे,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या वेळी शिवराज शेंडकर आणि गणेश जागडे म्हणाले,
“आजचा तरुण राजकारणापेक्षा विकासाला प्राधान्य देतो. सक्षम नेतृत्व, ठोस धोरणे आणि विकासाची स्पष्ट दिशा यामुळे मोठ्या संख्येने तरुण भाजपमध्ये सहभागी होत आहेत. आम्हाला केवळ आश्वासन नव्हे तर प्रत्यक्ष काम अपेक्षित आहे.”
या प्रवेश सोहळ्याला भाजपचे स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी प्रवेश करणाऱ्या तरुणांचे स्वागत करून पक्षवाढीसाठी सक्रिय काम करण्याचे आवाहन केले.
आगामी पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा प्रवेश भाजपसाठी राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा मानला जात असून राजगड तालुक्यात भाजप अधिक मजबूत होण्याची चिन्हे दिसत आहेत.














