नसरापूर (प्रतिनिधी) – उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त नसरापूर ग्रामपंचायतीतर्फे विविध विकासकामांचे उद्घाटन आणि भूमिपूजन आज मोठ्या उत्साहात पार पडले. यामध्ये अंगणवाड्यांची उभारणी, तसेच अंतर्गत रस्त्यांची कामे यांचा समावेश होता. या उपक्रमांमुळे गावाच्या सर्वांगीण विकासात महत्त्वाची भर पडणार आहे.
चेलाडी येथील पवार वस्तीमध्ये नव्याने बांधलेल्या सुसज्ज अंगणवाडीचे उद्घाटन सरपंच उषा विक्रम कदम यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अंगणवाडीत बालकांसाठी आवश्यक असलेल्या सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या असून, त्याचा लाभ येथील कुटुंबांना होणार आहे. याशिवाय कातकरी वस्ती येथे अंगणवाडीचे भूमिपूजन तसेच वनविहार आणि चांदणी महाल रस्त्यावरील अंतर्गत रस्त्यांच्या कामांचे भूमिपूजनही करण्यात आले.
या वेळी बोलताना सरपंच उषा कदम म्हणाल्या, “नसरापूरमधील अंगणवाड्यांना दर्जेदार स्वरूप देण्याचा आमचा प्रयत्न आहे. बालकांच्या पोषण आहाराकडे विशेष लक्ष देत त्यांच्या शिक्षणासाठी दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देण्याचे काम ग्रामपंचायतीमार्फत सुरू आहे. ‘बाल स्नेही गाव’ या संकल्पनेचा आपण यशस्वी अवलंब करत आहोत.”
या कार्यक्रमास उपसरपंच नामदेव चव्हाण, सदस्य संदीप कदम, सचिन परदेशी, विजय कुलकर्णी, सपना झोरे, मेघा लष्कर, गणेश दळवी, सुधीर वाल्हेकर, रमेश कदम, बाबू झोरे, राजू मिठाले यांच्यासह अनेक ग्रामपंचायत सदस्य, अधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.