मुंबई: गेल्या काही दिवसांपासून मुली व महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होताना दिसत आहे. यातच आता धारावी परिसरात राहणाऱ्या एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीला चाकूचा धाक दाखवत ६० वर्षांच्या नराधमाने अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पीडित मुलीच्या कुटुंबीयांच्या तक्रारीवरून धारावी पोलिसांनी आरोपीवर पोक्सो आणि लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करीत त्याला अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी ही धारावी परिसरात आपल्या आई वडीलांसोबत राहते. मंगळवारी दुपारी बाराच्या वाजण्याच्या सुमारास मुलीला घरात एकटे असल्याचे पाहत आरोपीची नियत फिरली आणि त्याने घरात प्रवेश करीत मुलीला चाकूच्या धाक धाकवित धमकाविले. तसेच आरडाओरड केल्यास गळा कापण्याची आणि कोणाला काही सांगितल्यास अॅसिड फेकण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केला.
चोरी केल्याचा केला बनाव, पण
आरोपीने अत्याचारानंतर चोरीच्या उद्देशाने घरातील दागिने शोधण्याचा प्रयत्न केला. मात्र, याच वेळी मुलीने मोठ्या शिताफिने आरोपीला चमका देत तेथून पळ काढला. काही वेळातच आई-वडील घरी आल्यानंतर तिने घडलेला संपूर्ण प्रकार त्यांना सांगितला. त्यानंतर पीडित मुलीच्या आई वडीलांनी धारावी पोलिसांत धाव घेत घडलेली घटना पोलिसांना सांगितली. त्यानुसार पोलिसांन आरोपीवर गुन्हा दाखल करीत अटक केली आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.