भोर : लोकसभेनंतर विधानसभेचे रणशिंग फुंगले गेल्याचे पाहिले मिळाले. आता कधीही आचारसंहिता लागू होऊ शकते, याच पार्श्वभूमीवर सरकार कॅबीनेट बैठका घेऊन अनेक निर्णय जाहीर करीत आहे. २८८ विधान सभेच्या मतदार संघात हाय व्होल्टेज लढती होणार असल्याचे सांगितले जात आहे. त्या संबधीच्या बातम्या, लेख, व्हिडिओ आदी गोष्टी पाहिला मिळतच आहेत. भोर विधानसभेची निवडणूक देखील इंट्रेस्टिंग होणार असल्याचे सांगितले जात आहे. सध्या सोशल मीडियावर एका व्हायरल झालेल्या पत्राची मोठ्या प्रमाणावर चर्चा होताना दिसत आहे. या पत्रातून प्रस्थापितांवर टीकीचे झोड उठविण्यात आली आहे. पत्राला निनावी वर्तमानपत्र आणि निनावी वार्ताहर असे हेडिंग देण्यात आले आहे.
प्रस्थापितांच्या विरोधात रणशिंग फुंकायला विरोधक उतरले मैदानात
गेल्या दीड दोन महिन्यांतील भोर विधानसभेच्या राजकीय परिस्थितीचा आढावा घेतल्यास आपल्या सर्वांच्या लक्षात येईल की, सर्वच पक्षीय नेते आपापल्या परीने उमेदवारी आणि त्यादृष्टीने मतदारसंघात फिरून आपला जनसंपर्क तयार करीत आहेत. यामध्ये चांदेरे साहेब, मांडेकर साहेब, रणजित दादा, कुलदीप तात्या किंवा किरण दादा असो सर्वच आपापल्या परीने प्रयत्न करीत आहेत. या नेत्यांबरोबरच त्यांचे समर्थकही मोठ्या संख्येने यात सहभागी झाले असल्याचे पाहिला मिळत आहे. तसेच नेत्यांचे विविध सोशल मीडिया आणि प्रत्यक्ष बरोबर फिरून समर्थन करीत असताना पाहवयास मिळत आहे आणि त्यात गैर काही नाही. परंतु, हे सर्व नेते केवळ एका प्रस्थापित व्यक्तीच्याच विरोधात मैदानात उतरले असल्याचे प्रकर्षाने जाणवते.
एवढी वर्ष लोटून विकास नाही
भोर मतदारसंघाचा विचार आणि अभ्यास केल्यास भोर विधानसभा ही काँगेस पक्षाच्या हाती असून आजपर्यंत मतदार संघात विशेष विकास झालेला दिसून येत नाही. मतदारसंघात स्वातंत्र्यप्राप्तीनंतरही एवढी वर्षे लोटून विकास झालेला नाही. तालुक्यात आजही अपुऱ्या दळणवळण आणि वाहतूक सुविधा, अपुऱ्या आरोग्य सुविधा, अपुऱ्या पायाभूत सुविधा, उद्योगधंद्यांचा अभाव परिणामी बेरोजगारी अशा समस्या पाहायला मिळत आहेत.
सरकारी अधिकाऱ्यांकडून नागरिकांची पिळवणूक
त्याचप्रमाणे मोठ्या प्रमाणात अतिक्रमण आणि उत्खनन होऊन पर्यावरणाची हानी होताना दिसत आहे. गरीब जनतेला आपल्या व्यक्तिगत कामांसाठी कचेरीच्या ठिकाणी विनाकारण खेट्या माराव्या लागत असून, अवास्तव शुल्क भरावे लागत आहे. भ्रष्ट सरकारी अधिकारी यांंच्याकडून त्यांचे आर्थिक शोषण आणि पिळवणूक होत आहे.
मागास म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भागाला जबाबदार कोण?
गड, किल्ले, इतर प्रेक्षणीय स्थळे यांचा अजिबातच विकास होताना दिसत नाही. त्याचबरोबर आणखी बऱ्याच गंभीर समस्या मतदारसंघात पहावयास मिळत आहेत. जागतिक कीर्ती असलेल्या आणि पुण्यापासून एवढ्या जवळ असलेल्या तिन्ही तालुक्यांची अवस्था ही अतिशय दयनीय झालेली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाची, त्यांच्या पाऊलखुणांची साक्ष देणारी आणि अखंड महाराष्ट्राची राजधानी असलेली पावनभूमी अतिशय मागास आणि आदिवासी म्हणून ओळखली जातेय. मग या सर्व परिस्थितीला जबाबदार कोण? असा सवाल केला आहे.
….म्हणून याला राजकीय भाषेत रडीचा डाव म्हणतात
भोर तालुक्यातील प्रस्थापित यांना आजवर तालुक्याच्या विकासासाठी योग्य धेये-धोरणे ठरवता आली नाहीत, विकासासाठी विविध योजना राबविता आल्या नाहीत. आजपर्यंत केवळ गोरगरीब जनतेची दिशाभूल करून, खोटी आश्वासने देऊन आणि लाचार पुढारी वर्ग हाताशी धरून या लोकांनी केवळ आपली झोळी भरली. दशहत आणि दबावतंत्राचा वापर करून सत्ता आपल्या ताब्यात ठेवण्यात यांनी शिखर गाठले आहे. परंतु, तरुण वर्ग आता सुज्ञ असून त्याच्या हे सर्व लक्षात येऊ लागले आहे. प्रस्थापित यांचे विरोधक असलेल्या उमेदवारांना तरुणाईचा आणि सर्वसामान्य जनतेचा वाढता पाठिंबा पाहून यांच्या पोठात आगडोंब उसळला आहे, यांच्या रात्रीच्या झोपा आणि दिवसाचे चैन हरवले आहे. आपण सत्तेत राहू की नाही या भीतीच्या भूताने जणू यांना झपाटलं आहे. त्यामुळे विरोधी उमेदवार यांवर चिखलफेक करणे, त्यांना नावे ठेवणे, बेकायदेशीर वर्तमानपत्राचा आधार घेऊन खोट्या बातम्या छापणे किंवा खोटे कथानक तयार करणे याशिवाय यांच्याकडे दुसरा पर्यायच उरला नाही आहे. त्यामुळे इतरांचे महत्त्व कमी करण्यासाठी असे खोटे मजकूर छापून जनतेची दिशाभूल करून जनतेचे समर्थन मिळविण्याचा विफल प्रयत्न केला जातोय…यालाच राजकीय भाषेत ” रडीचा डाव ” असे या पत्रात म्हटले आहे. यामुळे या पत्राची जोरदार चर्चा होताना दिसत आहे.
तालुक्यातील पत्रकारांकडून जाहीर निषेध
सध्या सर्वत्र व्हॉट्सॲप, फेसबुक गृपवर व इतर सोशल मीडियावर एकतर्फी नेत्याचे, पक्षाचे जयजयकाराचे निनावी बातमी स्वरूपात पॅम्प्लेट, डिजाइन प्रसिद्ध केले जात आहे. सदरचे डिझाईन बातमी म्हणून वृत्तपत्रात छापून आली असे समाजात भासवले जात आहे. त्यामुळे पत्रकारांच्या निःपक्षपाती भूमिकेचा व पत्रकारीतेचा अपमान होत आहे. अशा खोट्या एकतर्फी निनावी बातमीने भोर तालुक्यातील पत्रकारांची प्रतिमा डागाळत आहे. या कुठल्याही पत्रकाराने तयार न केलेल्या, कोणत्याही वृत्तपत्रात, दैनिकात छापून न आलेल्या सर्वत्र व्हॉट्सॲप फेसबुक गृपवर प्रसिद्ध होणाऱ्या निनावी फेक, खोट्या बातम्यांचा भोर तालुक्यातील सर्वच पत्रकार जाहीर निषेध करत आहोत.