भोर शहरासह तालुक्यातील विविध ठिकाणी शुक्रवार (दि.३) क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची १९४ वी जयंती विविध कार्यक्रमाचे आयोजन करत साजरी करण्यात आली. तालुक्यातील विविध महाविद्यालये , जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सामाजिक संघटना, राजकीय पक्ष कार्यालय, तसेच विविध शासकीय आस्थापनांसह विविध ठिकाणी सावित्रीबाई फुलेंना अभिवादन करण्यात आले. असेच पत्रकार संघ भोर कार्यालयात जिल्हा पत्रकार संघाचे उपाध्यक्ष संतोष म्हस्के, संघटक दत्तात्रय बांदल, तालुकाध्यक्ष पुरुषोत्तम मुसळे यांचे प्रमुख उपस्थितीत सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात करण्यात आला. यावेळी सोशल मीडिया तालुकाध्यक्ष कुंदन झांजले, उपाध्यक्ष दिपक पारठे , सदस्य विक्रम शिंदे, रुपेश जाधव आदि पत्रकार उपस्थित होते.
यावेळी बोलताना संतोष म्हस्के म्हणाले ,सावित्रीबाई फुले यांच्या विचारांचा वारसा आजच्या मोबाईलच्या विज्ञान युगात जपण्याची गरज आहे. दरवर्षी सर्वत्र देशभर सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस जयंती बालिका दिन तसेच महिला मुक्ती दिन म्हणून साजरी करण्यात येते. अन्याय ,जातीभेद , स्त्री शिक्षण, बालविवाह अशा समाजसुधारक कार्यात त्यांनी नेहमीच मोठा हातभार लावला आहे सध्या अद्यापही समाजात महिलांना मानाचे स्थान मिळत नाही व बालिकांसह , मुली सुरक्षित नाही त्यामुळे सर्व क्षेत्रात मुलींसह , महिलांना सन्मानाने वागविण्याची गरज असल्याचे मत सोशल मीडिया अध्यक्ष कुंदन झांजले यांनी व्यक्त केले. तालुक्यात सर्वत्रच ज्ञानज्योती, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती विविध सामाजिक उपक्रम, कार्यक्रमांनी साजरी करण्यात आली.