नसरापूर: नुकत्याच एका ५२ वर्षीय व्यक्तीची खूनाची घटना ताजी असतानाच इंजिनिअरिंग कॅालेजमध्ये शिक्षण घेणाऱ्या १७ वर्षीय मुलाचा मृतदेह एका विहिरीमध्ये आढळून आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. तसेच मयत मुलाच्या मृतदेहाला दगड बांधल्यात आल्याची माहिती सूत्रांनी राजगड न्यूजला दिली आहे. पुणे-सातारा महामार्गावर धांगवडी येथील राजगड ज्ञानपीठ इंजिनिअरिंग कॅालेजमध्ये मयत आयुष सतीश लिम्हन( वय १७ रा.पारवडी, ता. भोर) हा शिक्षण घेत होता.
याबाबत अधिक माहिती अशी की, आयुष लिम्हन राजगड ज्ञानपीठ इंजीनियरिंग कॉलेजमध्ये शिक्षण घेत होता. बुधवारी सकाळी सव्वा नऊ वाजता त्याच्या राहत्या गावामधून कॅालजच्या बसने कॅालेजला निघून गेला. मात्र, रात्री उशिरा झाला तरी मुलगा घरी न आल्याने चिंतेत असणारे वडील सतीश दत्तात्रय लिम्हण (वय ५४ वर्ष) यांनी बुधवारी २५ सप्टेंबर रोजी अपहरणाचा संशय व्यक्त करत रात्री उशिरा राजगड पोलीस ठाण्यात धाव घेत फिर्याद दिली.
त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञाताविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता. यांनतर या मुलाचा मृतदेह पारवडी गावातीलच एका विहिरीमध्ये आढळून आल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. राजगड पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला असून शवविच्छेदानासाठी भोर उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. या प्रकरणात अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. मुलाचे अपहरण झाले होते का, मग त्याचा मृतदेह विहिरीत एका दगडाला बांधलेल्या अवस्थेमध्ये कसा आढळून आला, हा सर्वांत मोठा प्रश्न आहे. या प्रकरणाचा पुढील तपास राजगड पोलीस करीत आहेत.
नागरिकांध्ये घातपात झाल्याची चर्चा
नुकतीच एका ५२ वर्षीय व्यक्तीची जुन्या वादातून झालेली घटना ताजी असतानाच एका १७ वर्षीय मुलाच्या मृत्यूबाबतच्या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेने येथील नागरिकांमध्ये आयुषसोबत घातपात झाल्याची चर्चा करण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.