नसरापूर – राजगड तालुक्यातील चेलाडी ते वेल्हे या मार्गावरील दयनीय परिस्थितीविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी मोठे आंदोलन उभारले. नसरापूर-चेलाडी येथे रस्त्यावरील खड्यांमध्ये झाडे लावून मनसेने अनोख्या पद्धतीने प्रशासनाचा निषेध नोंदवला. यावेळी मनसेचे पुणे जिल्हाध्यक्ष संतोष दसवडकर यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग आणि पालकमंत्री अजित पवार यांच्यावर जोरदार प्रहार केला.
दसवडकर म्हणाले, “अजित पवार विधानसभेत १०० कोटी नव्हे तर ५ हजार कोटी देण्याची ग्वाही देतात, पण ती ग्वाही फक्त नावालाच राहते. राजगड तालुक्यातील रस्त्यांची बिकट अवस्था, खड्डे आणि अपघात यांची जबाबदारी कोण घेणार? पाणी बारामतीला जातं, पण इथल्या जनतेचे हाल अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांना दिसत नाहीत का?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
अलीकडेच मार्गासनी येथे रस्त्यावरील खड्ड्यात अडकून एका तरुणाचा मृत्यू झाल्याची आठवण करून देत दसवडकर म्हणाले की, ही घटना शासनाच्या आणि प्रशासनाच्या बेफिकिरीचे एक उदाहरण आहे. वारंवार अपघात होत असून नागरिकांचे जीव जात आहेत, मात्र अधिकारी आणि सत्ताधारी गप्प बसले आहेत. जर योग्य ती अंमलबजावणी झाली नाही तर पुढील वेळी राष्ट्रीय महामार्ग रोखण्याचा इशारा त्यांनी दिला.
यावेळी सहकार सेनेचे जिल्हाध्यक्ष विलास बोरगे, राजगड तालुकाध्यक्ष दिगंबर चोरघे, मुळशी तालुकाध्यक्ष धनंजय टेमघरे, भोर शहराध्यक्ष शशिकांत वाघ, अशोक चोरघे, संतोष चोरघे, मिथुन चोरघे, संग्राम दसवडकर, पांडुरंग पिलाने यांसह असंख्य मनसे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.