नसरापूर : शिवगंगा खोऱ्यातील वेळू येथील महावितरणच्या वीज उपकेंद्राचे रखडलेले काम व अपुरा तसेच विस्कळीत वीजपुरवठा या प्रश्नांवरून संतप्त उद्योजक आणि स्थानिक नागरिकांनी सोमवारी सकाळी महावितरण कार्यालयावर धडक देत घेराव घातला. या आंदोलनावेळी अधिकारी स्पष्ट उत्तर देण्यात अपयशी ठरल्याने नागरिकांचा रोष आणखी भडकला.
शिवगंगा खोऱ्यातील अनेक छोटे-मोठे उद्योग गेल्या अनेक वर्षांपासून कमी क्षमतेच्या आणि खंडित वीजपुरवठ्याचा सामना करत आहेत. या समस्येवर कायमस्वरूपी उपाय म्हणून वेळू येथे नवीन वीज उपकेंद्र उभारण्याचा निर्णय घेण्यात आला होता. ग्रामस्थांनी दीड वर्षांपूर्वीच उपकेंद्रासाठी आवश्यक जागा उपलब्ध करून दिली असली, तरी प्रत्यक्ष काम मात्र अद्याप सुरू झालेले नाही.
या पार्श्वभूमीवर स्वराज्याचे शिलेदार संघटना, उद्योग व्यावसायिक व ग्रामस्थांनी संयुक्तरित्या आंदोलन छेडले. मागण्यांचे निवेदन कार्यकारी अभियंता देविदास बायकर यांना देण्यात आले. आंदोलनावेळी जिल्हा नियोजन समिती सदस्य अमोल पांगारे, इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर असोसिएशन महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष योगेश घोरपडे, माजी सरपंच ईश्वर पांगारे, तसेच उद्योजक सतीश कुलकर्णी, संजय राजेभोसले, प्रमोद पाटील, किरण पाटील, कैलास गोगावले, सोनबा घुले, ॲड. संतोष शिंदे, अजिंक्य पांगारे, गणेश वाडकर, गुलाब चोबे, दत्तात्रय गोगावले आदी मान्यवर उपस्थित होते.
स्थानिक उद्योजक दीपक पांगारे यांनी इशारा दिला की, “आठ दिवसांत वीजपुरवठा नियमित झाला नाही तर आणखी तीव्र आंदोलन केले जाईल तसेच वीजबिल आणि थकबाकी भरण्यास नकार देण्यात येईल.”
दरम्यान, कार्यकारी अभियंता देविदास बायकर यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले, “उद्योगांना नियमित वीजपुरवठा होण्यासाठी तातडीने उपाययोजना केल्या जातील. वेळू येथील उपकेंद्र उभारणीसाठी वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरू असून, कामाला लवकरच सुरुवात करण्याचा प्रयत्न केला जाईल.”