भोरः महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार? यावर सध्या मोठ्या प्रमाणावर चर्चा होताना दिसत आहे. राज्यात १४ वी विधानसभा विसर्जित झाल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. राज्यपाल यांनी शिंदे यांची नवे सरकार राज्यात येईपर्यंत काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून जबाबदारी सोपवली आहे. भाजपच्या सर्वाधिक जागा आल्याने त्यांच्याच पक्षाचा मुख्यमंत्री व्हावा अशी आग्राही मागणी करण्यात येत आहे. यातच पुन्हा एकदा मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनाच संधी मिळावी, यासाठी शिवसनेतील आमदार आग्रही आहे. मुख्यमंत्री पदावर दिल्लीत यावर खलबंत सुरू असतानाच आता राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी देवाला साकडे घालण्यात येत आहे.
भोर तालुक्यातील प्रसिद्ध बनेश्वर मंदिरात मुख्यमंत्रीपदी पुन्हा एकदा एकनाथ शिंदे यांचीच निवड व्हावी, यासाठी महादेवाला सर्व शिवसैनिकांच्या वतीने साकडे घालण्यात आले आहे. शिवसैनिकांच्या वतीने महादेव मंदिरात दुग्धअभिषेक करण्यात आला. यावेळी भोर तालुक्यातील शिवसेना तालुका प्रमुख अमोल पांगारे, विभाग प्रमुख मंगेश तनपुरे, राहुल पांगारे, चेतन पांगारे, राहुल मिसाळ, अमित गुरव, अजिंक्य पांगारे, प्रसन्न गयावळ आदी शिवसैनिक उपस्थित होते. तसेच जिल्हा नियोजन सदस्य देखील उपस्थित होते.