मावळः येथील इंदोरी परिसरात असणाऱ्या एका हॅाटेलमध्ये वेटर आणि ग्राहकासोबत झालेल्या वादातून खुनाची धक्कादायक घटना घडली आहे. हॅाटेल मालकाने कोयत्याने ग्राहकावर केलेल्या हल्ल्यात प्रसाद उर्फ किरण अशोक पवार यांचा मृत्यू झाला आहे. हॅाटेलमधील वेटरसोबत झालेल्या वादातून ही धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी तळेगावर एमआयडीसी पोलिसांनी अक्षय येवले याला ताब्यात घेतले आहे. सदर घटना ही दि. २६ नोव्हेंबर रात्री पावणेअकराच्या सुमारास घडली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडालेली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मावळ येथील इंदोरी परिसरातील एका हॅाटेलमध्ये मयत प्रसाद अशोक पवार आणि त्याचा मित्र जेवणासाठी रात्री पावणेअकरा वाजण्याच्या सुमारास आले होते. त्यांनी हॅाटेलमधील वेटरला मारहाण केली. यानंतर फोनवरून वेटरने मालकाला म्हणजेच अक्षय येवले याला झालेली घटना सांगितली. यानंतर फोनवरून अक्षयने ते दोघे प्रसाद आणि अभिषेक दोघे हॉटेल मालकाचे मित्र असल्याने त्यांनी भांडण करू नका, मी तिकडे येत आहे. असे सांगितले. तेव्हा फोनवरच दोघांनी हॉटेल मालकाला शिवीगाळ केली. त्यानंतर हे दोघे तिथून निघून गेले.
काही वेळाने पुन्हा ते कोयता घेऊन हॉटेल समोर आले. हॉटेल मालक आरोपी अक्षय येवले हा हॉटेल बंद करत होता. त्यावेळी दोघांनी अक्षय सोबत वाद घातला. या वादातून राग अनावर झाल्याने अक्षय येवले याने त्यांच्याच हातातील कोयता घेऊन दोघांवर वार केले. या घटनेत गंभीर जखमी असलेल्या दोघांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. प्रसाद उर्फ किरण अशोक पवार याचा मृत्यू झाला आहे. जखमी अभिषेक अशोक पवार याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.