लोणी काळभोर, ता.२५ : लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत हाणामारी, गुंडगिरी, चोऱ्या व घरफोडी अशा विविध गुन्ह्यांचे सत्र थांबण्याचे नाव घेत नाही. आता लोणी काळभोर (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील सिद्धाराम मळा व नांदे पाटील बल्लाळे वस्ती येथे चोरट्यांनी भरदिवसा घरफोड्या केल्याची घटना रविवारी (ता.२४) सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. घरफोडी करणारे चोरटे सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाले असले तरी ते मिळत का नाहीत अशी चर्चा सध्या सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, लोणी काळभोर येथील सिद्धाराम मळा व नांदे पाटील बल्लाळे वस्ती परिसरात दोन चोरटे दुचाकीवर फिरत होते. चोरट्यांनी पाळत ठेऊन दोन बंद घरे हेरली. रविवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास जोरदार पाऊस सुरु असतानाच चोरट्यांनी दोन बंद घरे फोडली. एका घरफोडीतून रोख रकमेसह सोन्याचे दागिने चोरी केल्याची माहिती समोर येत आहे. मात्र, एका ठिकाणी चोरट्यांना काहीही न मिळाल्याने त्यांनी घरातील सामानच अस्ताव्यस्त केले.