भोरः भोर विधानसभेत आघाडी, युती आणि अपक्ष उमेदवारांकडून जोरदार प्रचार केला जात आहे. यंदाची विधानसभेची निवडणूक मोठी चुरशीची होणार असल्याचे दिसत आहे. विधानसभेच्या निवडणुकीसाठी अनेक पक्षांकडून कस लावला जात असला तरी त्यामध्ये आगामी काळात होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्या संस्थेच्या निवडणुकीचे घोतक दडलेले आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना(उबाठा) युवा जिल्हा अधिकारी आदित्य बोरगे यांनी पुणे जिल्ह्याचे संपर्क प्रमुख सचिन अहिर यांच्याकडे भविष्यात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत आपला योग्य विचार होऊन सन्मानाचा वाटा मिळावा, अशी मागणी पत्राद्वारे केली आहे.
सन्माननीय पक्षप्रमुख उद्धव साहेब यांच्याकडून आणि मातोश्रीवरून आलेल्या आदेशाप्रमाणे भोर तालुक्यातील आणि विधानसभा मतदार संघातील प्रत्येक शिवसैनिकांनी आणि युवसैनिकांनी महाविकास आघाडी म्हणून खासदार सुप्रियाताई सुळे यांचे प्रामाणिक आणि निष्ठेने काम केले आहे. विजयात जिवाचं रान करून सिंहाचा वाटा उचलला आहे. येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत सुद्धा मातोश्रीच्या आदेशाप्रमाणे आपला निष्ठावान शिवसैनिक प्रामाणिक काम करेल, यात शंका नाही. परंतु, भोर, राजगड आणि मुळशीतील पक्ष संघटना वाढवण्यासाठी शिवसैनिकांना विधानसभा निवडणुकीत सन्मानाची वागणूक मिळावी अशी प्रमुख मागणी या पत्राच्या माध्यमातून करण्यात आली आहे.
तसेच भविष्यात येऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, भोर नगरपालिका, बाजार समिती व इतर निवडणुकीमध्ये आपला योग्य विचार होऊन सन्मानजनक वाटा मिळावा यासाठी आपण प्रयत्न करावेत अशी विनंती देखील करण्यात आली आहे.दशरथ गोळे तालुका संघटक, भारत नाना साळुंखे, अजित बाबा चंदनशिव, सौरभ देशपांडे, निशाताई सपकाळ, कुंडलिक बोरगे, भानुदास थिटे,अक्षय बोरगे, शरद शेंडकर, विलास बरदाडे पदाधिकाऱ्यांनी या मागणीला अनुमोदन दिले आहे.