भोर: धांगवडी ता.भोर येथील नामांकित विद्यालय जवळ शुक्रवारी दुपारी दोन जणांमध्ये झालेल्या भांडणात एकाला कोयत्याने मारहाण करण्यात आली. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली. जखमी युवकाने आरोपीविरुद्ध राजगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भोर तालुक्यातील धांगवडी येथील कॉलेजच्या समोर कॅन्टीनजवळ ही घटना घडली. फिर्यादी ओम सुभाश येवले आणि संशयित आरोपी अल्पवयीन यांच्यात काही कारणास्तव वादावादाची स्थिती निर्माण झाली. हा वाद वाढत गेला आणि शेवटी आरोपीने आपल्या हातात असलेला लोखंडी कोयता फिर्यादीच्या डाव्या हाताच्या मनगटावर मारला.
जखमी युवकाच्या मावसभाऊ आणि मित्रांनी मध्यस्थी करून दोघांना वेगळे केले. त्यानंतर आरोपी शिवीगाळ करत तेथून पळून गेला. जखमी युवकाला तातकाळ रुग्णालयात दाखल करण्यात आले.
पोलिसांनी आरोपीविरुद्ध भारतीय हत्यार अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. तर पुढील तपास पोलीस हवालदार निंबाळकर करीत आहे.