कोल्हापूरः आदमापूर येथे जाहीर सभेतून उद्धव ठाकरे यांनी युती सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांच्यावर टीकास्त्र डागले. सुरतला छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारण्याचे त्यांनी यावेळी सांगितले. हे सरकार गद्दार खोके सरकार असून, सगळ्यांना सुरतहून नेण्यात आले. लोकसभेनंतर यांना आता लाडक्या बहिणी दिसायला लागल्या आहेत. राज्यात महिला सुरक्षित नाहीत. महाराष्ट्रात महिला पोलीस पदे रिक्त असताना ती भरली जात नाहीत. महाराष्ट्र हा अदानीच्या घशात घातला जात असल्याचे म्हणत या सभेच्या माध्यमातून उद्धव ठाकरे यांनी खरपूस समाचार घेतला. के. पी. पाटील यांच्या प्रचार सभेत उद्धव ठाकरे हे बोलत होते.
यावेळी बोलताना ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांना देवा भाऊ, दाढीवाला भाऊ जॅकीटवाला भाऊ असे म्हणत खिल्ली उडवली. तसेच मोदी शहांचा महाराष्ट्र तुम्हाला मान्य आहे का, असा सवाल सभेला उपस्थित असलेल्या नागरिकांना ठाकरे यांनी केला. तसेच हे भाऊ जाऊ तिथे खाऊवाले भाऊ आहेत, अशी टीका ठाकरे यांनी केली. राज्यात आघाडी सरकार आल्यावर ५ जीवनावाश्य वस्तूंचे भाव स्थिर ठेवणार असल्याचे ठाकरे यांनी सांगितले. मुलींबरोबर महाराष्ट्रातील मुलांना देखील मोफत शिक्षण देणार, स्वतंत्र महिला पोलीस स्टेशन देखील उभे करणार असल्याची ग्वाही ठाकरे यांनी यावेळी बोलताना दिली.