खेड शिवापूरः खेड शिवापूर भागातील जनावरांना होणाऱ्या लंपी रोगाने एक गाय दगावली असल्याची घटना घडली आहे. तसेच अनेक जनावरांना देखील लंपीची लागण झाली असल्याची माहिती आहे. गेल्या चार महिन्यांपासून खेड शिवापूर भागात पशुवैद्यकीय अधिकारीच नसल्याने कोणत्याही प्रकारचे लसीकरण झाले नसल्यामुळे जनावरे दगावत आहेत. तत्कालीन पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. चव्हाण यांची बदली झाल्यानंतर या भागात कोणत्याही डॉक्टरची नियुक्ती करण्यात आलेली नाही. त्यामुळे चार महिन्यांपासून येथील जनावरांना लंपी प्रतिबंधक अथवा इतर रोगाची लागण होऊ नये, यासाठीची लस दिली गेली नसल्याने शिवापूर (ता. हवेली) येथील प्रशांत लक्ष्मण दिघे यांची गाय दगावली आहे
खेड शिवापूर भागात मोरदरी, रहाटवडे, कोंढणपूर, आर्वी, शिवापूर, श्रीरामनगर, खेड शिवापूर, रांजे, कासूर्डी, कुसगाव, खोपी अशी अनेक गावे येतात. त्यामुळे इतर पशुधन असलेल्या शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या भागात डॉक्टरच नसल्यामुळे अजून किती पशुधन गमवावे लागते हे संबधित प्रशासन बघत आहे की काय? असा प्रश्न आता येथील नागरिक उपस्थित करताना दिसत आहे.
संपर्क साधल्यास उडवाउडवीची उत्तरे
सध्या पशुवैद्यकीय विभागात सावळा गोंधळ सुरू आहे. ज्या डॉक्टरकडे या गावांचा अधिभार दिला आहे, त्यांना संपर्क साधला असता ते उडवाउडवीची उत्तरे देत आहेत. याबाबत गट विकास अधिकारी यांच्याकडे तक्रार केली आहे. लवकरच यावर कारवाई होईल अशी अपेक्षा असल्याचे शिवापूर गावचे सरपंच आण्णा दिघे यांनी सांगितले.
याबाबत गटविकास अधिकारी भूषण जोशी म्हणाले की, याची माहिती घेऊन लवकरात लवकर रिक्त असलेल्या ठिकाणी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती केली जाईल.