खंडाळा: खंडाळा तालुक्याचा केवळ मतांपुरता वापर करणाऱ्या मूकनायक आमदारांना त्यांची जागा दाखवून द्या, असे आवाहन अपक्ष उमेदवार पुरुषोत्तम जाधव यांनी केले. पाण्याचा पुळका असलेल्या आमदारांना गेल्या २५ वर्षांमध्ये पाण्याचा प्रश्न सोडवता आलेला नाही, असा घणाघात जाधव यांनी विद्यमान आमदारांवर केला.
त्यांचे वडिल १० वर्षे खासदार होते, तर १५ वर्षे आमदार अशी २५ वर्षे सत्ता त्यांच्या घरात असून देखील वाई तालुक्यातील कवठे केंजळ योजना त्यांना अद्यापर्यंत पूर्ण करता आलेली नाही. किसनवीर आबांच्या नावाने राजकारण करत असून त्यांचे स्मारक धूळखात पडले आहे, त्याचे सुशोभिकरण अजूनही यांना करता आलेले नाही. तसेच खंडाळ्यात ट्रॉमा सेंटर उभे करण्याचे काय झाले, अशी आवठण देखील जाधव यांनी यावेळी बोलताना विद्यमान आमदारांना केली आहे.
त्यांना अजूनही वाई शहराला भेडसावणारा पार्किंगचा प्रश्न सोडवता आला नाही. पुरुषोत्तम जाधव यांच्या खंडाळा तालुक्यातील संपर्क दौऱ्याला मोठा प्रतिसाद मिळाला असून, त्यांनी पारगाव ,खंडाळा, बावडा, भादवडे, शिवाजीनगर, मोरवे, अहिरे, सुखेड, बोरी, खेड, लोणंद, कोपर्डे, निपोडी, पाडळी, धावडवाडी, घाटदरे, हरळी या गावातीली नागरिकांशी जाधव यांनी संवाद साधला. त्यांच्या या संवाद दौऱ्याला नागरिकांचे उत्फुर्त प्रतिसाद मिळत आहे.