नसरापूर : राजगड पोलीस आणि दहशतवाद नियंत्रण कक्षाच्या (एटीसी) संयुक्त कारवाईत भोर तालुक्यातील कासुर्डी खेबा गावाच्या हद्दीत एका बोलेरो पिकअपमधून २४ लाखांचा गुटखा जप्त करण्यात आला आहे. या कारवाईत दोन आरोपीला अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुप्त माहितीच्या आधारावर राजगड पोलीस आणि एटीसीच्या पथकाने कासूर्डी खेबा येथील रोड वर गुटखा वाहतूक करणाऱ्या पिकअपमधून विविध कंपन्यांचा २४ लाखांचा गुटखा जप्त करण्यात आला. याप्रकरणी पोलिसांनी चेतन दत्तात्रय खांडेकर वय 20 वर्षे, रा. कोथरूड, पुणे मुळ रा. निजामपुर, ता. सांगोला, जि. सोलापुर ,प्रविण दत्तात्रय खांडेकर वय 23 वर्षे रा. कोथरूड पुणे मुळ रा. निजामपुर, ता. सांगोला, जि. सोलापुर आरोपीला अटक केली आहे.
जप्त केलेल्या गुटख्यामध्ये विविध कंपन्यांचा गुटखा समाविष्ट आहे. पोलिसांनी गुटखा आणि बोलेरो पिकअप वाहन ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी कृष्णा रामचंद्र कदम यांनी फिर्याद दिली असून अन्न आणि औषध प्रशासन (एफडीए) व राजगड पोलिसांकडून पुढील कारवाई करण्यात येणार आहे.
राजगड पोलीस आणि एटीसीच्या या कारवाईमुळे गुटखा तस्करांमध्ये खळबळ उडाली आहे. पोलिसांनी गुटखा तस्करीवर कारवाई सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.