जेजुरीः अंखड महाराष्ट्राचे कुलदैवत जेजुरीचा खंडोबा देवाच्या मर्दानी दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर ऐतिहासिक छत्री (गौतमेश्वर मंदिर) या ठिकाणी नियोजन बैठक पार पडली. दसरा (विजयादशमी) सणाच्या दिवशी सायंकाळी ६ वाजता (शेडा) खंडोबा देवाची पालखी सोहळा मंदिरातून रमण्याच्या दिशेने मार्गस्थ होणार असून, मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास कडेपठार आणि खंडोबा देवाची पालखींची भेट होणार असल्याचा माहिती गावाचे इनामदार पेशवे यांनी दिली. तसेच रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास (शेडा) कडेपठावरून खंडोबा देवाची पालखी मार्गस्थ होणार असल्याचे देखील त्यांनी यावेळी सांगितले.
या बैठकीत दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील खांदेकरी, मानकरी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. मार्तंड देवसंस्थानचे प्रमुख विश्वस्त अनिल सौंदडे यांनी दसरा सणादिवशी देवसंस्थानच्या वतीने करण्यात आलेल्या सोईसुविधांची माहिती यावेळी दिली. रमण्यातून दोन्ही पालखीमधील देवभेट मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास होणार असून, यावेळी मोठ्या प्रमाणावर फटक्यांची आतिषबाजी केली जाणार आहे. त्यानंतर कडेपठारची पालखी कडेपठार मंदिराच्या दिशेने जाणार आहे. यानंतर नवा गड्याची खंडोबा देवाची पालखी गावच्या दिशेने मार्गस्थ होणार आहे. रमण्याच्या पुढे आल्यावर आपट्याचा कार्यक्रम पार पडेल. जुनी जेजुरी मार्गे खंडोबा देवाची पालखी गावात येईल. त्यानंतर उभी पेठे मार्गे पालखी सोहळा गडावर दुसऱ्या दिवशी सकाळी पोहचेल. यानंतर गडावर खंडा(तलवार) स्पर्धा पार पडेल.
रमण्याच्या ठिकाणी असणार एलएडी स्क्रीन
ज्या ठिकाणी देवाच्या पालख्यांची भेट होते. त्या ठिकाणाला रमणा असे म्हटले जाते. या ठिकाणी एलएडी स्क्रीन लावण्यात येणार आहे. या स्क्रीनवर दोन मंदिरातील गाभाऱ्यातील दृश्य दाखविण्यात येणार असल्याची माहिती खांदकरीचे अध्यक्ष जालिंदर खोमणे यांनी सांगितले. यामुळे आलेल्या भाविकांना देवांच्या दोन्ही ठिकाणचे दर्शन घेता येणार आहे.