नसरापूर : पुणे जिल्हा येत्या काळात जागतिक क्रीडा नकाशावर झळकणार आहे. ऑलिम्पिक मानांकन असलेली आंतरराष्ट्रीय “पुणे ग्रँड चॅलेंज” सायकल स्पर्धा जानेवारी २०२६ मध्ये पार पडणार असून यात ५० हून अधिक देशातील नामांकित सायकलपटू सहभागी होणार आहेत. या स्पर्धेमुळे ग्रामीण पर्यटन, क्रीडा क्षेत्राबरोबरच रोजगारनिर्मिती व पायाभूत सुविधा विकासाला चालना मिळणार आहे.
राजगड टेक्निकल कॉलेज, धांगवडी (ता. भोर) येथे झालेल्या पत्रकार परिषदेत भाजप नेते माजी आमदार संग्राम थोपटे, माजी आमदार संजय जगताप, भाजप जिल्हा दक्षिण अध्यक्ष शेखर वढणे आणि जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब गरुड यांनी याबाबत माहिती दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या “खेलो इंडिया” संकल्पनेतून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, एकनाथ शिंदे आणि जिल्हा संपर्कमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा आयोजित होत असल्याचे त्यांनी सांगितले.
स्पर्धेच्या अनुषंगाने भोर, राजगड, मुळशी, पुरंदर, बारामती, मावळ, पुणे शहर व पिंपरी-चिंचवड या भागात दर्जेदार सायकल ट्रॅक उभारले जाणार आहेत. यासाठी रस्ते रुंदीकरणाचे काम हाती घेण्यात आले असून भोर-राजगड-मुळशी विधानसभा क्षेत्रासाठी १२१ कोटी आणि पुरंदर-हवेली क्षेत्रासाठी ११४ कोटी, असे एकूण २३५ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. रस्ते सात मीटर, तर जिथे शक्य नाही तिथे साडेपाच मीटर रुंद करण्यात येणार आहेत.
या वेळी भाजप राज्य प्रदेश सदस्य बाळासाहेब गरुड, शैलेश तांदळे, जिल्हा उपाध्यक्ष जिवन कोंडे, चिटणीस दीपक तनपुरे, भोर उत्तर अध्यक्ष संतोष धावले, उपाध्यक्ष सुनील पांगारे, दक्षिण अध्यक्ष रवींद्र कंक, राजगड अध्यक्ष राजेंद्र रेणुसे, मुळशी अध्यक्ष हनुमंत, समीर मारणे, पुरंदर अध्यक्ष संजय निगडे, सासवड शहराध्याक्ष आनंद जगताप, संदीप कटके उपस्थित होते.
“स्पर्धा चार फेजमध्ये होणार असून भोर, राजगड, मुळशी, मावळ, पुरंदर व बारामती तालुक्यातील रस्ते रुंदीकरणासह पायाभूत सुविधा उभारणीमुळे रोजगार आणि पर्यटन क्षेत्राला हजारो कोटींचा लाभ होणार आहे.”
– संग्राम थोपटे, माजी आमदार