जेजुरी: महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी २० नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून, पुरंदर विधानसभा मतदारसंघातील मतदारांना त्यांची मतदान केंद्रे व अनुक्रमांक या तपशीलाची माहिती सुलभरितीने उपलब्ध होण्याकरिता निवडणूक कार्यालयामार्फत बुथ लेव्हल ऑफिसर्सकडून मतदार चिठ्ठ्यांचे वाटप सुरू करण्यात आले असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी वर्षा लांडगे यांनी दिली.
पुरंदर विधानसभा मतदारसंघांमध्ये एकूण ४ लाख ६४ हजार १७ मतदार असून, ४१८ मतदान केंद्र आहेत. प्रत्येक मतदान केंद्रासाठी स्वतंत्र मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. संबंधित मतदान केंद्रांच्या बीएलओमार्फत मतदारांना मतदार चिठ्ठ्यांचे घरोघरी वाटप करण्यात येत आहे. मतदारांची मतदान केंद्र व अनुक्रमांक शोधण्याची ऐनवेळी होणारी धावपळ टाळण्यासाठी प्रशासनाने मतदार संघातील ४० पर्यवेक्षकांच्या देखरेखीखाली मतदानापूर्वीच मतदार चिठ्ठ्या घरपोच करण्याची कार्यवाही केंद्रस्तरीय अधिकारी यांच्यामार्फत सुरू केली आहे. या मतदार चिठ्ठीवर मतदारांची माहिती, मतदान केंद्राचे ठिकाण, मतदानाची तारीख व वेळ यांचा समावेश आहे.