राजगड न्युज नेटवर्क
खेडशिवापूर ता.२० राज्यांतील तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी, तसेच ग्रामीण भागातील विकासाला चालना देण्याचा उद्देश ग्रामीण कौशल्य विकास केंद्राचा आहे. त्यामुळे राज्यातील ५११ प्रमोद महाजन कौशल्य विकास केंद्राचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दि.१९ ऑक्टोबर रोजी दु.४ वाजता ऑनलाईन पध्दतीने उद्घाटन झाले. थेट प्रक्षेपणाला नागरिकांनी उत्तम प्रतिसाद दिला.
कौशल्य विकास केंद्र राज्यातील रोजगार मंदिरे – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
देशातील ऊर्जावान युवाशक्तीची क्षमता केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ओळखल्याचे नमूद करून मुख्यमंत्री म्हणाले की, युवा शक्ती मोठे संसाधन आहे, हे ओळखून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्किल इंडिया मिशन सुरू केले होते. गेल्या सहा वर्षांत बेरोजगारीचे प्रमाण घटले आहे. देशात गत नऊ वर्षात पाच हजार नवीन औद्योगिक प्रशिक्षण केंद्र – आयटीआय सुरु करण्यात आली. यातून चार लाख उमेदवारांना प्रशिक्षण मिळणार आहे. पीएम विश्वकर्मा ही क्रांतिकारी योजना सुरू करून पारंपारिक कौशल्याला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देण्यात आली आहे. आपण राज्याच्या अर्थसंकल्पात देखील ग्रामीण भागाकडून शहराकडे होणारे स्थलांतराचे प्रमाण कमी व्हावे यासाठी ग्रामीण भागात अशी केंद्रे सुरु करण्याचा मानस व्यक्त केला होता. त्यानुसार युद्ध पातळीवर यासाठी प्रमोद महाजन कौशल्य विकास केंद्रांचा आराखडा तयार केला. प्रत्येक केंद्रातून १०० उमेदवार असे प्रत्येक वर्षी सुमारे ५० हजार कुशल उमेदवार तयार होतील. आपण बेरोजगारांची फौज असे नेहमी म्हणतो… पण ही आमची कुशल फौज असणार आहे. जे उद्याच्या महाराष्ट्रात सन्मानानं नोकरी व्यवसाय करीत असतील, असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, राज्याच्या तळागाळात, ग्रामीण भागात, खेड्यातल्या युवकांचा कौशल्य विकास होईल. यात ३० टक्के महिला असतील. ग्रामीण भागातील कारागीरांना सुद्धा आणखी चांगले प्रशिक्षण मिळेल. आपण आयटीआयच्या प्रशिक्षणार्थीचे विद्यावेतन वाढवून ५०० रुपये इतके केले आहे. बारावीनंतर १५ हजार उमेदवारांच्या रोजगार व शिक्षण-प्रशिक्षणासाठी टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस सोबत करार केला आहे. स्टार्ट अप्सना विविध पुरस्कार देऊन प्रोत्साहन दिले आहे. राज्यातील आयटीआयमध्ये ७५ व्हर्चुअल क्लासरूम्स सुरु केले. मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमात बारा हजाराहून अधिक नवीन उद्योग व्यवसाय सुरु करू इच्छिणाऱ्यांना कर्ज दिल्याचे उल्लेख करून, ही प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्र राज्यातील रोजगार मंदिरे बनतील, असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.दिवंगत प्रमोद महाजन यांच्याकडे आधुनिकतेची दूरदृष्टी होती याचा उल्लेख करून मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी राज्यात २९० रोजगार मेळाव्यांचे आयोजन केले होते. त्याद्वारे १ लाख ४० हजार तरुणांना रोजगार उपलब्ध करून दिल्याचेही त्यांनी सांगितले. यापुढेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे बलशाली भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी कार्यरत राहील, असेही ते म्हणाले.
कौशलय विकास केंद्राची सुरुवात होणे ही अत्यंत आनंदाची बाब आहे. भारताला महाशक्ती बनायचे असेल तर गावखेड्यातील लोकांचा कौशल्य विकास होणे आवश्यक हे मोदींनी सांगितले होते. कौशल्य विकासातून काय साध्य होते हे आज आपण पाहतोय. आज जेव्हा भारत जगातील पाचवी अर्थव्यवस्था बनला आहे, तेव्हा रोजगाराच्या संधी मिळवण्यासाठी युवकांचे कौशल्य प्रशिक्षण महत्त्वाचे आहे. मोदींजींच्या नेतृत्वात तिसरी अर्थव्यवस्था बनताना कौशल्य प्रशिक्षित मानव संसाधन मुबलक प्रमाणात उपलब्ध असणे गरजेचे आहे. युवकांना संधीही जोडण्याचे काम कौशल्य विकास केंद्र करतील हा मला विश्वास आहे. ग्रामीण व्यवस्थेला बळकटी देणाऱ्या वर्गाला सन्मानित करणाऱ्या विश्वकर्मा योजना सुरु केल्याबद्दल मी पंतप्रधानांचे मनापासून आभार मानतो. कौशल्य विकास केंद्रांच्या माध्यमातून विश्वकर्मा योजनेला कसे पुढे घेऊन जात येईल यासाठी आम्ही प्रयत्नरत आहोत. मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी पुढाकार घेतला आणि ही संकल्पना प्रत्यक्षात उतरवण्यासाठी प्रयत्न केले त्यासाठी लोढांचे अभिनंदन करतो. ५११ केंद्रांपासून सुरु झालेला प्रवास ५००० केंद्रांपर्यंत जाईल हा विश्वास देतो, असे ही फडणवीस म्हणाले.
शिवसेना शिंदे गट, भाजपचे स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या वतीने कौशल्य विकासाचे थेट प्रक्षेपण कार्यक्रम गुरुवार ( दि. १९ ) रोजी शेतकरीवाडा वेळु ( ता. भोर ) येथे पार पडला. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख रमेश कोंडे, जिल्हा नियोजन समिती सदस्य अमोल पांगारेे, भोर तालुका भाजप अध्यक्ष जीवन कोंडे, वेळूचे माजी सरपंच शिवाजी वाडकर, अरविंद शिंदे, अण्णासाहेब शिंदे,दिपक करजांवने, पुनम पांगारे, तसेच दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते, नागरिक महिला व विद्यार्थी उपस्थित होते.
स्क्रीनद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस व अजित पवार यांनी महाराष्ट्राच्या योगदानमध्ये नरेंद्र मोदी यांचे मोठे योगदान असल्याचे सांगत रोजगार, उद्योजकता व नाविन्यता कुशल महाराष्ट्र, रोजगार मुक्त महाराष्ट्र आदी बाबीचे महत्व वर्तविले. यावेळी उपस्थित टाळ्या वाजवून दाद दिली. यावेळी मुग्धा स्कील कौशल्य पथकाने स्क्रीनचे व्यवस्था केली होती.