बारामती (सनी पटेल ) : तालुक्यातील कऱ्हावागज येथील हॉटेल शारदा एक्झिक्युटिव्ह बार, रेस्टॉरंट आणि लॉजिंग येथे 13 जानेवारी 2025 रोजी रात्री एका धक्कादायक घटनेत तीन हल्लेखोरांनी हॉटेलच्या मॅनेजर व कर्मचाऱ्यांवर प्राणघातक हल्ला केला. या प्रकरणात पोलिसांनी जलद कार्यवाही करत तिघा संशयितांना अटक केली आहे.
हॉटेलचे मॅनेजर ऋषिकेश भाऊसाहेब मिंड यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, रात्री 11 वाजता हॉटेल बंद झाल्यानंतर सर्वजण झोपले होते. मध्यरात्री 1.45 च्या सुमारास विशाल बाबा मोरे, संदेश उर्फ आबा अनिल शिंदे, आणि निखिल अशोक खरात यांनी हॉटेलमध्ये प्रवेश करून मॅनेजरशी वाद घातला. त्यांनी शिवीगाळ करत मद्य देण्यास नकार दिल्याबद्दल राग व्यक्त केला व मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी निखिल खरात याने धारदार चाकूने हल्ला केला, मात्र मॅनेजर मागे सरकल्याने वार त्यांच्या पायावर झाला. हल्ल्यात एक कर्मचारी दिनेश वर्मा गंभीर जखमी झाला.
घटनेची माहिती मिळताच माळेगाव पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सचिन लोखंडे यांनी तातडीने गुन्हे शोध पथक रवाना केले. पोलीस उपनिरीक्षक देवीदास साळवे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे संशयितांचा हडपसर गाडीतळ परिसरात पाठलाग करून पहाटे अटक केली.
या कामगिरीसाठी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड यांचे मार्गदर्शन लाभले. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक देवीदास साळवे करत आहेत.
सदरची कामगिरी पंकज देशमुख, पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण, गणेश बिरादार , अपर पोलीस अधीक्षक बारामती विभाग, सुदर्शन राठोड . उपविभागीय पोलीस अधिकारी बारामती उपविभाग,अविनाश शिळीमकर. वरिष्ठ पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, पुणे ग्रामीण यांचे मार्गदर्शनाखाली माळेगाव पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी स.पो.नि. सचिन लोखंडे, पोलीस उपनिरीक्षक अमोल खटावकर, देविदास साळवे, पोलीस अंमलदार राहुल पांढरे, विजय वाघमोडे, ज्ञानेश्वर मोरे, नंदकुमार गव्हाणे, अमोल राऊत, सागर पवार, जयसिंग कचरे, अमोल कोकरे यांनी केलेली आहे.