पुणेः शहरातील स्वारगेट ते जिल्हा न्यायालय मार्गिकेवर भूयारी मार्गे धावणाऱ्या मेट्रोचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी (narendra modi pune) यांच्या हस्ते करण्यात येणार होते. मात्र, काल झालेल्या मुसळधार पावसामुळे मोदींचा पुणे दौरा रद्द करण्यात आल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. सर परशुराम विद्यालयाच्या मैदानावर मोंदीची सभा पार पडणार होती. त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर चिखल साचलेला आहे. यामुळे आता उद्घाटनाचा कार्यक्रम अॅानलाईन पद्धतीने घेता येईल का, याची चाचपणी प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी सभास्थळी जात पाहणी केली होती. त्या पार्श्वभूमीवर आज सकाळी मोदींचा पुणे दौरा पावसामुळे रद्द करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. गणेश कला क्रीडा मंच या ठिकाणी चाचपणी देखील करण्यात आली होती. पण ती जागा अपुरी पडत असल्याने ती देखील जागा रद्द करण्यात आली आहे. याचे कारण म्हणजे देशाचे पंतप्रधान पुण्यात येणार म्हटल्यावर त्यांचे भाषण ऐकण्यासाठी मोठ्या प्रमाणावर नागरिक येथे येणार त्यामुळे त्यासाठी तितक्या प्रमाणात जागा असणे गरजेचे होते. आता मेट्रोचा लोकार्पण सोहळा कधी पार पडणार हे पाहणे महत्वाचे असणार आहे.