भोर : भोर तालुक्यात महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम राबविणाऱ्या गणेशतात्या निगडे युवा मंचतर्फे भोंगवली पंचायत समिती गणातील महिलांसाठी भव्य ‘होम मिनिस्टर व लकी ड्रॉ’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ‘सन्मान मातृशक्तीचा’ या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेला हा कार्यक्रम शनिवार, दि. २९ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता शिवमंगल लॉन्स, पांडे (ता. भोर) येथे रंगणार आहे.
महिलांच्या कौशल्य, सहभाग व आत्मविश्वास वाढविण्याचा उद्देश ठेवून या कार्यक्रमात विशेष आणि उपयुक्त अशी भलीमोठी बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. प्रथम क्रमांकाच्या विजेत्यास स्कूटी, द्वितीय क्रमांकास फ्रिज, तृतीय क्रमांकासाठी वॉशिंग मशीन, तर चौथ्या क्रमांकासाठी एलईडी टीव्ही, पाचव्या क्रमांकासाठी मायक्रोवेव्ह ओव्हन आणि सहाव्या क्रमांकासाठी मिक्सर अशी आकर्षक बक्षिसांची मोठी यादी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे महिलांमध्ये या स्पर्धेबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
यासोबतच कार्यक्रमातील मुख्य आकर्षण ठरणार आहे होम मिनिस्टर खेळ, ज्यामध्ये प्रत्येक खेळातील विजेत्या महिलेस विशेष पैठणी बक्षीस म्हणून देण्यात येणार आहे. याखेरीज, कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या प्रत्येक महिलेस एक खास भेटवस्तू देऊन सन्मानित केले जाणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे.
आकर्षक सजावट, मनोरंजनासह कौशल्याचा संगम, कुटुंबासह आनंद लुटता येईल असे वातावरण आणि सुयोग्य नियोजन यामुळे हा कार्यक्रम महिलांसाठी संस्मरणीय ठरणार आहे. महिलांनी फक्त प्रेक्षक न राहता सहभाग व नेतृत्वाच्या संधींकडे वाटचाल करावी हाच या उपक्रमाचा प्रमुख हेतू असल्याचे गणेश निगडे यांनी सांगितले. महिलांकडून या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
भोंगवली पंचायत समिती गणातील नोंदणीकृत महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन गणेशतात्या निगडे युवा मंचतर्फे करण्यात आले आहे. महिला सक्षमीकरणाच्या दिशेने उचललेले हे पाऊल कौतुकास्पद असल्याचे परिसरातील नागरिकांकडूनही समाधान व्यक्त केले जात आहे.













