वेल्हा (Velha): वांगणी ते वांगणी वाडी रस्त्यासाठी पीएमआरडीए अंतर्गत १ कोटी २९ लाख रुपयांचा निधी मंजूर होऊन या रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली. मात्र इतकी मोठी रक्कम या रस्त्यासाठी खर्चून देखील अवघ्या एका महिन्यातच या रस्त्याची दुर्दशा झाली असून, रस्ता उखडला असून ठिकठिकाणी रस्त्याला खड्डे पडले आहेत. यामुळे या रस्त्याने प्रवास करणाऱ्या नागरिकांना मोठा मनस्ताप होत आहे. यामुळे येत्या काही दिवसांमध्ये जर हा रस्ता सुस्थितीमध्ये केला नाही तर वांगणी आणि वांगणीवाडी ग्रामस्थांच्या वतीने तीव्र स्वरुपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.
पावसातच झाले काम
या रस्त्याच्या कामाचे इस्टीमेट द्या, असे सांगून देखील त्यांनी इस्टीमेट दिले नाही. तसेच त्यांना सांगितले होते की काम बंद करा, तरी त्यांनी काम चालूच ठेवले. रस्त्याच्या कामासाठी हरकत घेऊन सुद्धा पावसातच या रस्त्याचे काम पूर्ण केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
निकृष्ठ स्वरुपाच्या कामामुळे रस्ता की खड्डा असा प्रश्न
या रस्त्याचे काम पूर्ण होऊन एक महिना झाला नाही, तेच पूर्ण रस्ता खराब झाला आहे. संपूर्ण रस्त्यावर खड्डे पडले आहेत. वांगणी आणी वांगणीवाडी गावच्या सरपंच, ग्रामस्थांनी काम थांबवून सुद्धा ठेकेदाराने निकृष्ट दर्जाचे काम केले आहे. यामुळे दोन्ही गावच्या वतीने लवकरच तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.
अवघ्या दीड किलोमीटरच्या रस्त्यासाठी तब्बल १ कोटी २९ लाखः ग्रामस्थांचा आरोप
दीड किलोमीटरच्या रस्त्यासाठी १ कोटी २९ लाख रुपये खर्च करण्यात आले. हे रस्ते कोणाचे पोटं भरण्यासाठी आणले जात आहेत. संबधित अधिकारी तसेच येथील लोकप्रतिनिधी यांनी यावर तत्काळ लक्ष देऊन आवाज उठवावा. हा रस्ता लवकरात लवकर सुस्थितीमध्ये केला नाही, तर दोन्ही गावांच्या वतीने आंदोलन करणार असल्याच्या इशारा देण्यात आला आहे .चार महिन्यातच रस्ता उखडला पीआरडीच्या हद्दीतील हा रस्ता असून, यासाठी तब्बल १ कोटी २९ लाख रुपये शासनाने मंजूर करुन खर्च केले. एका महिन्यातच रस्त्याची दुरअवस्था झाली आहे.