जेजुरीः सोमेश्वरनगर येथील करंजेपूल या ठिकाणी एका चहा विक्रेत्याच्या स्टॅालवर पुस्तकंं वाचण्यासाठी ठेवण्यात आली आहे. राजू बडदे असे येथे चहास्टॅालवर पुस्तकं वाचण्यासाठी ठेवलेल्या अवलिया व्यक्तीचे नाव आहे. दिवाळीत भारत ज्ञान विज्ञान समुदाय संघटना आणि परिस पब्लिकेशन पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने फटाके नकोत, पुस्तके हवीत या उपक्रमाअंतर्गत येथे पुस्तक प्रदर्शन भरविण्यात आले आहे.
येथे पुस्तकांचा स्टॉल लावण्यात आला होता. यामध्ये संतसाहित्य, पुरोगामी, महापुरुष आणि कथा कादंबरी अशा सर्व प्रकारची पुस्तके उपलब्ध करण्यात आली आहे. या पुस्तक प्रदर्शनाला ग्राहकांचा अतिशय चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे बडदे यांनी सांगितले. यंदाचे दिवाळीत स्टॉल लावण्याचे तिसरे वर्ष आहे. मूळातच राजू बडदे यांना वाचनाची अतिशय आवड आहे. त्यांच्या या संकल्पनेचे परिसरातील नागरिकांकडून कौतुक केले जात आहे. आजूबाजूच्या परिसरातील वाचक या ठिकाणी येऊन पुस्तकं चाळताना पाहिला मिळत आहे. पुस्तकांच्या या प्रदर्शनाला युवावर्गाचा देखील चांगला प्रतिसाद लाभत आहे.