नसरापूर प्रतिनिधी : वरवे खुर्द येथील हॅप्पीनेस हब सोसायटीत पैशांच्या वादातून तिघांनी मिळून एका बांधकाम व्यावसायिकाला बेदम मारहाण केल्याची घटना नुकतीच घडली. या प्रकरणी राजगड पोलिसांनी तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शंकर दिलीप राजपूत (वय ४०, रा. हॅप्पीनेस हब सोसायटी, वरवे खुर्द, मूळ रा. कापुरहोळ) हे बांधकाम व्यवसायाशी संबंधित असून, १५ जुलै रोजी रात्री १० वाजण्याच्या सुमारास सोसायटीमधील एफ बिल्डिंगच्या पार्किंगमध्ये थांबले होते. यावेळी संशयित आरोपी सागर कैलास कुंभार, राहुल कैलास कुंभार आणि कुणाल उर्फ जंबो रेपावत (सर्व रा. वरवे खुर्द) यांनी त्यांच्याशी पैशासंदर्भात वाद घातला.
वादाचे रूपांतर लवकरच मारहाणीमध्ये झाले. तिघांनी एकत्रितपणे शंकर राजपूत यांना शिवीगाळ केली, दमदाटी केली व त्यानंतर हाताने, लाथाबुक्क्यांनी तसेच लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केली. या मारहाणीत ते गंभीर जखमी झाले असून, त्यांना तत्काळ स्थानिक खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. उपचार घेतल्यानंतर तब्येत स्थिर झाल्यावर त्यांनी पोलिसात अधिकृत तक्रार दाखल केली.
या तक्रारीच्या आधारे राजगड पोलीस ठाण्यात सागर कुंभार, राहुल कुंभार आणि कुणाल रेपावत यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार निंबाळकर करत आहेत.