नसरापूर : सातारा-पुणे महामार्गावर अवैध वस्तूंची वाहतूक होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. याच पार्श्वभूमीवर सोमवारी राजगड पोलिसांनी अवैध गुटखा तस्करीवर मोठी कारवाई केली. डायल 112 वर आलेल्या कॉलच्या आधारे पोलिसांनी तातडीने हालचाल करत अंदाजे 60 लाखांचा गुटखा जप्त केला.
मिळालेल्या माहितीनुसार, महामार्गावरून मोठ्या ट्रकमधून अवैध गुटखा व पानमसाल्याची वाहतूक केली जात असल्याचा संदेश पोलिसांना प्राप्त झाला. त्यानंतर राजगड पोलिसांनी उपविभागीय अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक तयार केले. पोलिसांनी संशयित ट्रकला (MH 04 JU 1133) सापळा रचून थांबवले असता त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर गुटखा व पानमसाला आढळून आला. प्राथमिक या मालाची किंमत अंदाजे 60 लाख रुपये इतकी असल्याचे स्पष्ट झाले आहे.
या कारवाईनंतर ट्रक चालक ताब्यात घेतला असून संबंधितांवर चौकशी सुरू असून गुटखा नेमका कोठून आणला होता, कुठे नेण्यात येत होता आणि या तस्करीमागे कोणाचे हात आहेत, याबाबत तपास सुरु आहे. तसेच जप्त केलेल्या मालाचा तपशील गोळा करून पुढील कायदेशीर प्रक्रिया करण्यात येत आहे. पोलिस सूत्रांनी सांगितले की, या प्रकरणात गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू असून संबंधित आरोपींवर कठोर कारवाई केली जाणार आहे.
गुटखा विक्री व वापरावर राज्य सरकारने बंदी घातली असतानाही अशा प्रकारे मोठ्या प्रमाणावर तस्करी होत असल्याने स्थानिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. या कारवाईमुळे राजगड पोलीस ठाण्याच्या दक्षतेचे कौतुक होत असून, डायल 112 या हेल्पलाइन क्रमांकामुळेच अवैध गुटखा तस्करीचा मोठा बेकायदेशीर साठा पोलिसांच्या हाती लागला आहे.