भोरः तालुक्यात विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने राजकीय नेते मंडळी कामाला लागल्याचे चित्र पाहिला मिळत आहे. विविध पक्षांच्या नेतेमंडळींकडून गावभेट दौऱ्याचे आयोजित करण्यात येत आहे. विधानसभा क्षेत्रात येणाऱ्या गावांना भेट देत नेते मंडळींकडून पोस्ट व्हायरल करण्यात येत आहे. बड्या नेत्यांकडून कार्यकर्त्यांच्या माध्यमातून विविध प्रकारच्या कार्यक्रमांचे आयोजन विविध ठिकाणी सुरू झाले आहे. अशातच धांगवडी येथे रविवारी २९ सप्टेंबर रोजी शिवसेनेच्या वतीने महाविजय संवाद मेळावा व शिवसेना कार्यालायाचा उद्घाटनाचा कार्यक्रम पार पडला. या मेळाव्यात विधानसभेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या प्रमुख उपस्थितीत बाळासाहेब चांदेरे यांनी कार्यक्रम आयोजित केला होता. मात्र, या कार्यक्रमाला पक्षातीलच एका बड्या नेत्याने दांडी मारल्याने राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधान आले आहे.
पक्षातील अंतर्गत वाद आला चव्हाट्यावर, जिल्हाप्रमुख बाळासाहेब चांदेरे यांच्यावर भोर विधानसभेतील शिवसैनिक नाराज?
भोर विधानसभेची निवडणूक लढविण्यासाठी इच्छुकांची मांदियाळी पाहिला मिळत आहे. यामुळे अंतर्गत गटबाजी उफाळून आली असल्याचे दिसून येत आहे. भोर विधानसभेत शिवसेना पक्षात अंतर्गत नाराजी असल्याचे बोलले जात असून, खुद्द तालुका अध्यक्ष दशरथ जाधव यांनी ही बाब मान्य केली आहे. शिवसेनेच्या जेष्ठ नेत्या नीलम गोऱ्हे यांना देखील ही बाब जाणवली. त्यामुळे त्यांनी विधानसभेतील अंतर्गत मतभेद बाजूला ठेवून तसेच आपापसातील रुसवे फुगवे बाजूला सारून निवडणुकीला सामोरे जाण्याचा सल्ला कार्यकर्त्यांना दिला. सदर कार्यक्रमाचे आयोजन हे भोर तालुक्यात करण्यात आले होते. मात्र, या कार्यक्रमाला गर्दी झाली होती मुळशी तालुक्यातील नागरिकांची. यामुळे सदर कार्यक्रमावर टीका करण्यात येत असून, देव दर्शनासाठी तालुक्यातील ज्या सभा भरवल्या जातात त्यामध्ये गर्दी खेचण्यासाठी यात्रांचे आयोजन करण्यात येत असल्याचा आरोप देखील करण्यात येत आहे.
भोर तालुक्यातील शिवसैनिकांनी कार्यक्रमाला दांडी मारल्याने चर्चांण उधान
तसेच चांदेरे यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला भोर तालुक्यातील शिवसैनिकांनी दांडी मारल्याने वेगवेगळ्या चर्चा झडू लागल्या आहेत. यामुळे पक्षातील अंतर्गत धूसफूस चव्हाट्यावर आली आहे. चांदेरे यांच्याबद्दल पक्षात नाराजीचा एक मतप्रवाह आहे. असे देखील सांगण्यात येत असून यामुळे नाराजीचा सूर असल्याचे बोलले जात आहे. शिवसेना पक्षात दोन गट पडल्यावर पहिल्यांदा बाळासाहेब चांदेरे यांनी एकनाथ शिंदेंच्या ताफ्यात जाणे पसंत केले. यामुळे चांदेरे यांच्यासाठी हा प्लस पॉईंट असल्याचे त्यावेळी बोलले गेले. मात्र, त्यांची एक अॅाडिओ क्लिल्प व्हायरल झाली होती. ही क्लिल्प त्यांच्यासाठी चांगलीच डोकदुखी ठरली होती. ऐन लोकसभेच्या निवडणुकीत एका नेत्याने शिवसेना पक्षात प्रवेश केल्याने अनेकांनी भुवय्या उंचावल्या होत्या. त्या बड्या नेत्याचा तालुक्यात दांडगा जनसंपर्क असून, इच्छकांच्या भावूगर्दीत कोणाचे तिकीट कापले जाते आणि कोण विजयाचा शिल्पकार होतो हे पाहणे महत्वाचे असणार आहे. आता घोडेमैदान दूर नाही.
तालुका प्रमुख मरजीचे शिवसैनिकांची घालमेल
जिल्हाप्रमुख बाळासाहेब चांदेरे हे भोर विधानसभेतून निवडणूक लढविण्यास इच्छुक आहेत. त्यांनी त्यासाठी तयारी देखील सुरू करत गाव भेट दौरे सुरू केले आहेत. तालुक्यात जात असताना फक्त तालुका प्रमुख आणि पदाधिकारी सोडले, तर शिवसैनिक असा कोणी त्यांच्या बरोबर दौऱ्यात पाहायला मिळत नाही, अशी देखील चर्चा आता रंगू लागली आहे. जिल्हा प्रमुख असलेले चांदेरे यांना फक्त त्यांच्या मर्जीतील तालुका प्रमुख आणि पदाधिकारी हवे असल्याचे शिवसैनिक चर्चा करत आहेत. यामुळे शिवसैनिकांनी चांदेरे यांच्या कार्यक्रमाकडे व दौऱ्याकडे पाठ फिरवलेली पाहायला मिळत असून, तिकीट कोणाला मिळेल याची मात्र शिवसैनिकांच्या मनात घालमेल झालेली पाहायला मिळत आहे.