नसरापूर: गेल्या काही दिवसांपूर्वीच मांढरदेवीचे दर्शन घेऊन पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या वाहनाचा शिवरे येथील मातीच्या ढिगाऱ्यामुळे अपघात घडल्याची घटना ताजी असतानाच या ढिगाऱ्याजवळ आज गुरुवार दि. २८ नोव्हेंबर रोजी मध्यरात्रीच्या सुमारास एका चारचाकी वाहनाचा अपघाताची घटना घडली आहे. या अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी हानी झाली नसून, वाहनातील प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली आहे. साधारण ही अपघाताची घटना मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, पुणे-सातारा महामार्गावर शिवरे (ता. भोर) येथे उड्डाणपुलाच्या कामामुळे रस्त्यावर टाकलेल्या मातीच्या ढिगाऱ्यामुळे ही अपघाताची घटना घडली आहे. उड्डाणपुलाचे काम सुरु असल्याने पुण्याकडे जाणारी वाहतूक पर्यायी रस्त्यावर वळविण्यात आली आहे. परंतु, त्या रस्त्यावर मातीचा ढिगारा तसाच पडला असून यामुळे वाहनचालकांना वाहन चालवताना मोठा अडथळा निर्माण होत आहे. पुण्याच्या दिशेने जाणारे चारचाकी वाहन या ढिगाऱ्याला धडकून पलटी झाले. शेजारीच असलेल्या पेट्रोल पंपावरील कामगारांनी धाव घेत वाहनातील सहा प्रवाशांना बाहेर काढले. वाहनाने तीन ते चार चार पलटी घेतल्या असल्याची प्राथमिक माहिती मिळत असून या दुर्घटनेत कोणालाही गंभीर दुखापत झाली नाही. काहींना किरकोळ जखमा तर काहींना मुका मार लागला आहे. या वाहनात एकून सहा प्रवासी प्रवास करीत होते.
ठेकेदार व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे दुर्लक्ष
शिवरे येथील पूलाच्या काम गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे. यामुळे वाहतूक वळविण्यात आलेल्या ठिकाणी अपघात टाळण्यासाठी फलक, रिफ्लेटक्टर लावण्याची मागणी स्थानिक नागरिक व प्रवासी करीत आहेत. मात्र, याकडे ठेकेदार व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण दुर्लक्ष करीत आहे. मातीचा ढिगारा तसात असून, या ढिगाऱ्यामुळे आतापर्यंत अनेक अपघात घडली आहेत. यामुळे तात्काळ उपायोजना करण्याची मागनी जोर धरू लागली आहे.