भोर : भोर तालुक्यातील पळसोशी गावातील शंकर महादेव म्हस्के यांनी पळसोशी गावच्या ओढ्यात बेकायदेशीर बांधकाम केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी ग्रामस्थ विनायक आण्णा म्हस्के यांनी २४ मे रोजी भोरचे तहसीलदार, उपविभागीय अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभाग, पंचायत समिती,व भोर पोलीस स्टेशन यांना निवेदन देऊन कारवाईची मागणी केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, म्हस्के यांनी ओढ्यात अंदाजे १५ ते २० फुट उंचीचे आरसीसी बांधकाम केले आहे. या बांधकामामुळे ओढ्याचा मार्ग अडथळा आला आहे आणि भविष्यात पूर आल्यास गावात पाणी घुसण्याची शक्यता आहे.
म्हस्के यांनी सरकारी ओड्याच्या क्षेत्रामध्ये अंदाजे १० ते १५ फुट पुरून आर सी सी मध्ये अनाधिकृत/विनापरवाना बांधकाम करीत आहेत. त्यामुळे ग्रामस्थांना सदर ओढ्यामध्ये जाणे येणे करण्याचा व जनावरांना पाण्यावर नेण्याचा मार्ग बंद होत आहे. तसेच सदर ठिकाणी मावलांगाचे देवाचे ठिकाण असून त्या ठिकाणी म्हस्के यांनी बांधकाम केल्याने ग्रामस्थांच्या भावना दुखावल्या आहेत.
म्हस्के यांनी याबाबत मौजे पळसोशी प्रतिष्ठित व्यक्तींना कळवून देखील संबंधित अधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती. परंतु, सरपंच, गाव कामगार तलाठी, पोलीस पाटील यांनी या तक्रारीकडे दुर्लक्ष केले आणि म्हस्के यांना बांधकाम पूर्ण करण्यास मदत केली, असा आरोप म्हस्के यांनी केला आहे.
याशिवाय, म्हस्के यांनी हे बांधकाम ग्रामपंचायत आणि तालुका प्रशासनाच्या परवानगीशिवाय केले आहे. ग्रामस्थ विनायक म्हस्के यांनी याबाबत गावकरी तलाठी आणि पोलीस पाटलांकडे तक्रार केली होती, परंतु त्यांनी या तक्रारीकडे डोळे झाक करत कोणतीही कारवाई केली नाही.
यामुळे म्हस्के हे आता जिल्हाधिकारी निवेदन देऊन तलाठी आणि पोलीस पाटलावरही कारवाईची मागणी करणार आहेत असे त्यांनी सांगितले.