भोरः येथील भोर एसटी स्थानकामध्ये मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून, या खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचत आहे. यामुळे बसस्थानकाच्या आवारामध्ये चिखल व सर्वत्र घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. अशातच प्रवासी नागरिकांना एसटीची वाट पाहात थांबावे लागत आहे. या दुरावस्थेकडे भोर आगाराचे पुर्णपणे दुर्लक्ष होत आहे. यामुळे एसटीने दररोज प्रवास करणारे विदयार्थी व यांनी नाराजी व्यक्त केली आहे. भोर एसटी स्थानकात डांबरीकरण करण्यात आले मात्र, हे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याने नवीन इमारत व जुनी इमारती पुढील व मागील बाजूस मोठमोठे खड्डे पडलेले आहेत.
ज्यावेळी स्थानकामध्ये एसटी येते, त्यावेळी जागा पकडण्यासाठी प्रवाशांची मोठी धावपळ सुरू होते. यावेळी खड्ड्यांमध्ये पावसाच्या पाण्यात काही नागरिकांचा पाय घसरून पडल्याचे प्रकार देखील घडलेले आहेत. तसेच याच खड्ड्यात एसटी बसेस जात असल्याने काही नागरिकांच्या अंगावर खड्ड्यात साचलेले पाणी उडत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. एसटीमध्ये जागा धरण्याच्या नादात आणि या खड्ड्यांमुळे अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. भोर स्थानकातून एसटीने शालेय विद्यार्थी मोठ्या प्रमाणात दररोज प्रवास करीत आहेत. तसेच ज्येष्ठ नागरिक हे देखील प्रवास करीत असतात. यामुळे स्थानकामध्ये प्रवासी संख्या अधिक असून, खड्ड्यांचे तातडीने बुजविण्याची मागणी प्रवास करणारे नागरिक करू लागले आहेत.
तात्पुरती मलमपट्टी करुन उपयोग काय?
एसटी स्थानकात मोठ्या प्रमाणात चिखल झाला असून अशा वातावरणात नागरिकांना एसटीची वाट पाहात तासंतास बसावे लागत आहे. दर वर्षी पावसाळ्यात अशी दियनीय अवस्था स्थानकाची असते. मुरुम टाकून यावर तातपुरती मलमपट्टी केली जाते. मात्र, कायमस्वरुपी उपाययोजना का केली जात नाही, हा मोठा प्रश्न उपस्थित झाला आहे. याकडे एसटी आगार सर्रास दुर्लक्ष करीत असल्याचे काही नागरिक सांगत आहे.
सध्याची स्थानकाची अवस्था
- जुन्या इमारतीत बसण्यासाठी गैरसोय
- शौचालयात घाणीचे साम्राज्य
- पिण्यासाठी चांगले पाणी नाही.
- एसटी स्थानकाची जागा खाजगी वाहनांची पार्किग
- यामुळे गाडया मागे पुढे घेण्यास अडचण
एकंदरीत भोर एसटी स्थानकाची अवस्था अत्यंत दयनीय झालेली आहे. भोर शहर शिवसेनेच्या वतीने शहराध्यक्ष नितिन सोनावणे यांनी स्थानकातील खड्डे बुजवावे म्हणून भोर आगार प्रमुख यांना निवेदन दिले आहे. जर खड्डे बुजवले नाहीत, तर आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.