भोर: भोर-महाड मार्गावरील वरंधा घाटातील शिरगाव (ता. भोर) येथील प्रेक्षणीय धबधब्यावर एक आणि वारवंड गावच्या हद्दीत नीरा-देवघर धरणाचे दृश्य पाहण्यासाठी एक असे दोन सेल्फी पॉईंट उभारण्यात आले आहेत. मात्र, या ठिकणी उभारण्यात येत असलेल्या सेल्फी पॅाईंला निसर्ग प्रेमींकडून विरोध करण्यात येत आहे. भोर येथील निसर्गप्रेमी अस्लम अत्तार यांच्या म्हणण्यानुसार धबधब्याच्या मधोमध सेल्फी पॅाईट उभारण्यात आल्यामुळे धबधब्याचे निसर्गिक सौंदर्य झाकले गेले आहे. त्यामुळे सेल्फी पॅाईंट ऐवजी भूशी धरणालासारख्या पायऱ्या किंवा रॅम्प बसविण्यात यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.
शासनाच्या योजनेतून ‘सेल्फी पॅाईंट’
शिरगावचा धबधबा हा वरंधा घाटातील मुख्य पर्यटनस्थळांपैकी एक आहे. पावसाळ्यात येथील धबधब्याखाली अनेक जण भिजण्याचा आनंद लुटतात. सेल्फी पॅाईंटसाठी शासनाच्या योजनेतून २५ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती आहे. या निधीमधूनच शिरगाव येथील धबधब्यावर एक आणि वारवंड गावच्या हद्दीत नीरा-देवघर धरणाच्या येथे एक असे दोन सेल्फी पॉईंट उभारण्यात आले आहेत.
सेल्फी ऐवजी पायऱ्या बसविणे गरजेचे
सेल्फी पॅाईंटवऐवजी भूशी धरणावर ज्या पद्धतीने पायऱ्या बसविण्यात आलेल्या आहेत. त्या पद्धतीच्या पायऱ्या या ठिकाणी बसविण्यात याव्यात. तसेच रॅम्प करण्यात यावा, अशी मागणी आता निसर्ग प्रेमींकडून जोर धरू लागली आहे. यामुळे शासनाने मंजूर केलेल्या या सेल्फी पॅाईंवर विरोध दर्शविण्यात येत आहे.