पावसाच्या रिपरिपीने चिखलाचा थर ,संथ गतीने कामाचा फटका
भोर – कापूरव्होळ रस्त्याच्या संथ गतीने चालणा-या कामामुळे पावसाच्या रिपरिपीने भाटघर गावाजवळील कॉर्नरवरील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात चिखलाचा थर साचला असुन दुचाकी वाहन चालकांची घसरगुंडी झाली आहे. आज सकाळपासून २० ते २५ दुचाकी ( टू व्हिलर) घसरून पडल्या असुन किरकोळ अपघात जखमी झाले आहेत. रस्त्याच्या संथ गतीने चालणा-या कामाचा फटका प्रवासी वाहन चालकांना होत आहे. एकेरी वाहतूक भली मोठी खोली साईडपट्टी, दुस-या बाजुच्या रस्त्यावर चिखलाचा थर, चिखल राडारोडा पाणी अशी दुरावस्था झाली आहे. जवळपास एक फूट चिखलाचा थर साचला असुन रस्त्याची दुरावस्था झाली आहे.
तेथील रहिवासी असणाऱ्या राष्ट्रवादीचे सामाजिक कार्यकर्ते अतुल काकडे ,कुणाल धुमाळ,अक्षय खंडाळे ,रूषिकेश गायकवाड यांना नागरिकांचे दुरध्वनी आल्यावर त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन आपल्या सोबतच्या युवकांना घेऊन पडलेल्या दुचाकीस्वारांना उचलले आणि येणाऱ्या जाणाऱ्यांना सावकाश जाण्याचा सल्ला देण्यात आला. पडलेले काहीजण किरकोळ जखमी झाले असून मोठी हानी झाली नाही.येथील रस्त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे तसेच काम करताना योग्य ती दक्षता घेण्यात यावी असे यावेळी अतुल काकडे यांच्याकडून सांगण्यात आले.