भोरः येथील हिर्डोशी गावात विजयादशमी दसरा सणादिवशी कैक वर्षांपासून चालत आलेल्या पारंपारिक गजनृत्याचे सादरीकरण धामणदेववाडी ग्रामस्थांनी केले. या पारंपरिक गजनृत्याला खूप महत्व आहे. हे नृत्य सादर करून धामणदेववाडी ग्रामस्थांनी दसरा सण मोठ्या उत्साहात साजरा केला.
दरवर्षी या दिवशी येथील ५३ गावचे दैवत असणाऱ्या वाघजाई माता मंदिर व कांगुरमलनाथ मंदिरासमोर हिर्डोशी, धामणदेववाडी येथील ग्रामस्थ पारंपरिक गजनृत्य सादर करतात. गावातील एक वृद्ध व्यक्ती देवतांच्या नावाने उल्लेख करून तरुण आणि ग्रामस्थ गोलाकार रिंगण करून मोठ्या उत्साहात मैदानभर फेर धरतात.
यात धनगर समाजातील सर्व लहान, थोर ग्रामस्थ सहभागी होतात. ग्रामदैवत, कुलस्वामिनीसह विविध देवतांच्या नावाने चांगभलं असा जयघोष करीत गज नृत्याला सुरूवात केली जाते. साधारण एका तासानंतर हे नृत्य हरहर म्हणत थांबवले जाते. त्यानंतर देवाला गोड भाताचा नैवेद्य प्रसाद दाखवून तो सर्वांना दिला जातो.