भोर – शहरातील मुख्य बाजारपेठेच्या रस्त्यावर मागील महिन्यापासून नगरपालिका प्रशासनाकडून बंदिस्त गटाराचे काम सुरू आहे परंतु सदरचे काम हे अतिशय संथ गतीने सुरू असून येथील नागरिकांना व व्यापाऱ्यांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे . बाजारपेठेतील जोड रस्ते मुख्य रस्त्याला जोडण्याच्या ठिकाणी खोदली असल्याने बाजारपेठेतून ये -जा करणाऱ्या वाहन चालकांना वाहतूक कोंडीसह वादावादी करत त्रास सहन करावा लागत आहे. बाजार पेठेचा मुख्य रस्ता असल्याने बाजारपेठेतील ग्रामीण भागातून येणाऱ्या पादचारी नागरिकांना देखील गल्लीबोळातून वाट शोधावी लागत आहे.
दरम्यान सदरचे बंदिस्त गटाराचे काम करताना अनेक अडचणी, समस्या येत आहे असे नगरपालिका प्रशासनाकडून सांगितले असले तरी ज्या ठिकाणाहून काम पुढे करत गेले आहेत मागील बाजुचे काम अर्धवट अवस्थेत राहील्याने शहरातील नागरिकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ज्या बाजुचे काम अर्धवट झाले तेथील व्यापारी दुकानदारांच्या दुकानासमोर रस्ता खोदल्याने दूकानात येण्या जाण्यासाठी खड्ड्यातुन जावे लागत जेष्ठ नागरिक, वयोवृद्धांना खड्ड्यातून वर घरात अथवा दुकानात चढता उतरता येत नाही.रस्ता अरूंद झाल्याने दुचाकी वाहनस्वार बेशिस्त, बेफिकीर रस्त्यावर वाहने लावत आहेत .रस्त्यावर वाहतूक कोंडी होत असुन दररोज नागरिकांमध्ये , वाहनचालकांमध्ये वादावादी होत आहे.रस्ता खोदलेल्या बाजुच्या दुकानात मागील पंधरा दिवसांपासून मंदी असल्याचे चित्र दिसत आहे .धुराळा- धुळीचे साम्राज्य दुकानातुन पसरले आहे सदरचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याची मागणी किराणा माल व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष अनिल निवृत्ती पवार व भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे अध्यक्ष भालचंद्र मळेकर यांनी केले आहे.