भोरः उत्रौली येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत पंचायत समितीच्या शिक्षण विभागाकडून तालुकास्तरीय बालविकास व चालू घडामोडींवर आधारित उद्बोधन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. भोर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी किरणकुमार धनवाडे व गटशिक्षणाधिकारी राजकुमार बामणे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कार्यशाळा संपन्न झाली.
राज्यात सध्या संवेदनशील गुन्हे घडत आहेत. काही दिवसांपूर्वी बदलापूर येथे शाळेमध्ये लहान मुलीवर अत्याचार झाल्याची घटना घडली होती. यामुळे सगळीकडे अधिकारी, शिक्षक, पालक, समाज व विद्यार्थी यांना काळजीत टाकणाऱ्या मन सुन्न करणाऱ्या घटना घडत आहेत. महिला व बालक यांच्यावर होणारे लैंगिक, शारीरिक व मानसिक अत्याचार समाजाच्या अधःपतनास कारणीभूत ठरत आहेत. त्या अनुषंगाने “बालहक्क सुरक्षा -जनजागृती ” या अतिसंवेदनशील विषयांवर या कार्यशाळेमध्ये भोरच्या संरक्षण अधिकारी एम .जी. जाधव तसेच एन .बी. मोरे यांनी महिला आणि कायदे, पोस्को (P0CSO )कायदा , कौटुंबिक हिंसाचार आणि संरक्षण, छेडछाड विरोधी कायदा , बाललैंगिक अत्याचार आणि जागरुकता, तक्रारीची पद्धत व कार्यवाही या विषयांवर विशेष मार्गदर्शन केले.
याप्रसंगी कायदे विषयक माहिती पुस्तकांचे वाटप करण्यात आले. प्रत्येक शाळेत उद्बोधन वर्ग घेऊन लहान मुली, मुले व स्त्रिया यांविषयी विविध कायदे तसेच सद्यस्थितीत नेमके काय करावे, अंमलबजावणी कशी करावी, याबद्दल विशेष मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यशाळेमध्ये 50 प्राथमिक शिक्षक, 24 केंद्रप्रमुख, गटसाधन केंद्र कर्मचारी यांनी सहभाग घेतला होता. या प्रसंगी विस्तार अधिकारी विठ्ठल गुंड, सुधीर साने, तालुका गटसमन्वयक प्रभावती कोठावळे, केंद्रप्रमुख संघटना तालुका अध्यक्षा अंजना वाडकर, केंद्रप्रमुख सखाराम बलकवडे, पद्मजा नाईक, मंगल मालुसरे, सुनिता गायकवाड, साधना गायकवाड, सुषमा पाटील, अलका लोखंडे, संजय ताम्हाणे, शिवाजी जाधव, विजय थोपटे, अरविंद बढे, पोपट तांगडे, गुणवंत इंगळे, राजू पडवळ, शैला कोठावळे उपस्थित होते.