भोर – आपल्या हिंदू संस्कृतीत गाईला गोमाता संबोधले जाते ही गोमाता राष्ट्रमाता असुन याच गाईंचे पूजन करण्याचा अनोखा उपक्रम रोहिडा गोमाता समिती व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने बारे खुर्द येथे दिपावली वसुबारस निमित्त शुक्रवार (दि १७) रोजी गावामध्ये घेण्यात आला . यावेळी बारे गावातील ज्ञानेश्वर बदक यांनी पुढाकार घेऊन गावातील एकूण १८ गाई व वासरे एकत्र आणून त्यांचे एकत्र पूजन केले. प्रत्येक गाईला खाद्य सुग्रासचे एक पोते ,गुळ व गाई मालकांना दिवाळी आकाश कंदील भेट वस्तू देण्यात आले. यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सदस्य व रोहिडा समितीचे सदस्य यांनी गाईंचे पूजन करत गाईंना गुळ व खाद्य दिले.
समुद्रमंथनाच्या वेळेस पाच कामधेनू उत्पन्न झाल्या होत्या त्यापैकी नंदा नामक धेनूस उद्देशून व्रत केले जाते. या दिवशी अनेक जन्मांच्या कामना पूर्ण व्हाव्यात याकरिता वासरासहित गायीची पूजा केली जाते. ह्या दिवसापासून घरासमोर रांगोळी काढण्यास सुरुवात करतात. काही स्त्रियांचा या दिवशी उपवास असतो.घरातील गाय वासरू यांना अंघोळ घातली जाते. अंगाला हळद लावली जाते, त्यांच्या अंगावर नवी वस्त्रे घातली जातात. ह्या दिवशी गहू, मूग खात नाहीत. स्त्रिया बाजरीची भाकरी व गवारीच्या शेंगाची भाजी खाऊन उपवास सोडतात. भरपूर कृषी उत्पादन व्हावे, आपल्या मुला-बाळांना चांगले आरोग्य मिळावे व सुख लाभावे म्हणून ही अश्विन महिन्यातील द्वादशीला गाईंची व वासरांची वसुबारस म्हणून पूजा केली जाते आख्यायिका पुराणात आहे.
सध्या गाईच्या दुधावर लाखो गोरगरीब कुटुंबाचा उदरनिर्वाह होतो. गाईचे दूध, गोमूत्र, शेण, तूप, दही व त्यापासून बनलेले पदार्थ यांत औषधी गुण असल्याचे आयुर्वेदात सांगितले आहे.त्याला पंचगव्य असे म्हणतात. स्मरणशक्ती वाढवायला गायीचे दूध उत्तम आहे. गाईचे शेणाने सारविलेल्या घरात कीटक कमी आढळतात.गाईंच्या शेणापासून व गोमुत्रापासुन शेतीला सेंद्रीय खत देखील मोठ्या प्रमाणात मिळते. आयुर्वेदिक औषधांमध्ये यांचा उपयोग केला जातो तेहतीस कोटी देवीदेवता गोमातेच्या पोटात वास करतात असं शास्त्र सांगते. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज म्हणायचे “गाईचे रक्षण केलियाचे पुण्य बहुत आहे..” आजच्या युगात आपली गोमाता संकटात आहे. रोज राजरोसपणे गोवंश व गोमातेची कत्तल केली जाते आणी यातुन हिंदुंच्या भावना दुखावल्या जातातच परंतु देशाची खुप मोठी हानी होत असते. सध्या शहरीकरणामुळे गोपालन करणारे शेतकरी दिवसेंदिवस कमी होत चाललेत आणी नकळत कृत्रिम भेसळयुक्त दुध लाखो लोकांना प्यावे लागत आहे. आणी त्याचा परीणाम ह्रदयरोग, डायबेटिस, व्यंगत्व, नपुंसकता असे अनेक दुर्धर रोग होत आहेत. या सगळ्या गोष्टींची जाण ठेवुन भोर तालुक्यातील तसेच अन्य भागातील शेतकरी बंधुंनी गोपालन करावे, गोरक्षण करुन गोशाळेत असलेल्या गोमातांना आश्रय मिळावा, चारापाणी, आरोग्य तपासणी या गोष्टी वेळच्या वेळी मिळाव्यात यासाठी ‘रोहिडा गोमाता समिती’ गोसेवकांच्या आर्थिक निधितुन शेतकरी बंधुंना, गोशाळेला मदत करत आहे. गेल्या तीन महिन्यांपासुन अनेक ठिकाणी चारापाण्यासाठी मदत कर्तव्य समजुन करण्यात आली आहे.यापुढेही जास्तीत जास्त परीश्रम घेवुन गोधन संरक्षण , संवर्धन करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे रोहिडा गोमाता संरक्षण समितीकडून सांगण्यात आले.

















