प्रतिनिधी : इम्रान अत्तार
भोर : तालुक्यातील वरंधा घाटातील शिरगाव जवळ सोमवारी (दि.२९) पहाटेच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाला तर दुसरा गंभीर जखमी झाला आहे.
पुण्याहून कोकणात दर्शनासाठी निघालेली एमएच १२ एचझेड ९२९९ ही चारचाकी गाडी रस्त्याच्या कामासाठी खोदलेल्या खड्ड्यात कोसळली. या घटनेत राहुल विश्वास पानसरे (रा. मुंबई) यांचा जागीच मृत्यू झाला. तर अहिल्यानगर, संगमनेर येथील एक तरुण गंभीर जखमी झाला असून त्याला महाड येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अपघाताच्या वेळी घाट परिसर धुक्याने वेढलेला होता. धुक्यामुळे खड्डा लक्षात न आल्याने गाडी थेट खड्ड्यात कोसळली. या खड्ड्यात पावसाचे पाणी व मोठे दगड असल्याने गाडीचे मोठे नुकसान झाले आणि पानसरे यांचा जागीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक अक्षय धुमाळ, भिमाजी पोळ, दत्तात्रय पोळ यांनी तत्काळ धाव घेत जखमींना मदत केली. दरम्यान, भोर पोलीस निरीक्षक अण्णा पवार, हवालदार अक्षय साळुंके, गणेश लडकत, सुनील चव्हाण यांनी घटनास्थळी पोहचून पंचनामा व पुढील कार्यवाही केली.
या अपघातामुळे वरंधा घाटातील रस्त्यांच्या कामांबाबत प्रशासनाच्या निष्काळजीपणाचा प्रश्न उपस्थित झाला आहे. स्थानिक नागरिकांनी या ठिकाणी योग्य प्रकारे सूचना फलक व सुरक्षेची उपाययोजना करावी, अशी मागणी केली आहे.