पुणे: बाणेर येथील एका बहुमजली इमारतीचे बांधकाम करीत असताना सातव्या मजल्यावरून पाय घसरून एका व्यक्तीचा दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना नुकतीच घडली होती. सुरक्षितेसाठी कोणतीही उपाययोजना न केल्याने कामगाराला आपला जीव गमावावा लागला होता. या प्रकरणी बाणेर पोलिसांनी बांधकाम व्यावसायिकासह ठेकेदार, साइट इंजिनिअर आणि प्रकल्प व्यवस्थापक अशा चार जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
बाणेर येथील वृंदानंद ब्लिस या इमारतीच्या बांधकामाचे काम सुरू होते. सातव्या मजल्यावरून खाली पडून अजित वरुणलाल बघेल (वय-२५) या कामगाराचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी बाणेर पोलिस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक शिवाजी आदिनाथ राहिगुडे यांच्या फिर्यादीवरून निष्काळजीपणाचा ठपका ठेवत कामगाराच्या मृत्यूस कारणीभूत बांधकाम व्यावसायिक, ठेकेदार, साइट इंजिनिअर आणि प्रकल्प व्यवस्थापक यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बांधकाम व्यावसायिक उत्तम रमणिकभाई मकवाना यांच्यासह ठेकेदार, साइट इंजिनिअर आणि प्रकल्प व्यवस्थापक यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस उपनिरीक्षक रुपेश चोळके यांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत मजूर हा मूळचा झारखंडचा रहिवासी आहे. तो गेल्या वर्षभरापासून या साइटवर काम करत होता. मंगळवार (दि.१०) सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास वाजता वृंदानंद ब्लिस इमारतीच्या सातव्या मजल्यावर तो काम करीत असताना त्याचा तोल जाऊन तो जमिनीवर पडला. उंचीच्या ठिकाणी जोखमीचे काम करताना सुरक्षितता जाळ्या किंवा त्यासंबंधी सुरक्षा प्रोटोकॉल साइटवर उपलब्ध करून देण्यात आले नव्हते. त्यामुळे कामगाराला आपला जीव गमवावा लागला असल्याचे सांगितले आहे.