भोर/राजगड – तालुक्यातील चेलाडी ते राजगड (वेल्हे) हा रस्ता आज अक्षरशः मृत्यूचा मार्ग बनला आहे. मोठमोठे खड्डे, खचलेले डांबर आणि पावसाळ्यात दलदलीसारखी अवस्था यामुळे प्रवासी, ग्रामस्थ व पर्यटक यांचा जीव धोक्यात आला आहे. या रस्त्यावर झालेल्या अनेक अपघातांत निष्पाप युवकांचा बळी गेला; तरीही प्रशासन मात्र बेफिकीर! या निष्क्रियतेविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेना, राजगड-भोर तालुक्याच्या वतीने येत्या रविवारी, 31 ऑगस्ट रोजी सकाळी 9 वाजता जोरदार जन आंदोलन होणार आहे.
“खड्डा तेथे झाड” या अनोख्या आंदोलनातून मनसे कार्यकर्ते रस्त्याची दयनीय अवस्था शासन आणि संबंधित अधिकाऱ्यांच्या तोंडावर मारणार आहेत. रस्त्यावरचा प्रत्येक खड्डा झाडांनी सजवला जाईल, जेणेकरून या रस्त्याच्या दुर्दशेचे चित्र स्पष्ट दिसेल. “रस्ते दुरुस्तीवर कोट्यवधींचा निधी खर्च दाखवला जातो, मग तरी रस्ते असे खड्ड्यांनी भरलेले का? हा निधी नेमका कुठे जातो?” असा थेट सवाल मनसे कार्यकर्त्यांनी केला आहे.
चेलाडी ते राजगड हा रस्ता केवळ स्थानिक ग्रामस्थांसाठी नाही, तर ऐतिहासिक राजगड किल्ल्यावर जाणाऱ्या हजारो पर्यटकांसाठी जीवनवाहिनी आहे. व्यापारी, शेतकरी, शालेय विद्यार्थी आणि रुग्णवाहिका यांना या मार्गावरून दररोज जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो. एकीकडे “पर्यटनवाढ” आणि “ग्रामविकास” यांची भाषणे दिली जातात; पण प्रत्यक्षात रस्त्यांचा कचरा करून नागरिकांचा जीव धोक्यात टाकला जातो, असा आरोप ग्रामस्थांनी केला.
मागील अनेक वर्षांपासून या रस्त्याच्या दुरुस्तीची फक्त आश्वासने दिली जात आहेत; प्रत्यक्षात काम शून्य! “रस्ते दुरुस्तीला जबाबदार असलेले अधिकारी व संबंधित लोकप्रतिनिधी यांना उत्तर द्यावेच लागेल. आता नागरिक शांत बसणार नाहीत. बदल हवा आहे तर लढा द्यावाच लागेल,” असा इशारा मनसे जिल्हाध्यक्ष संतोष दसवडकर यांनी नागरिकांच्या वतीने दिला आहे.
रविवारी होणारे हे आंदोलन प्रशासनाच्या बेफिकिरीला चपराक ठरणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. मात्र एक गोष्ट निश्चित – आता जनता रस्त्यावरील खड्ड्यांसोबत नाही, तर खड्ड्यांना जन्म देणाऱ्या निष्क्रिय व्यवस्थेविरुद्ध उभी राहिली आहे.