शिरवळ : सातारा व पुणे जिल्ह्याच्या सीमेवरील शिंदेवाडी या ठिकाणी आज सातारा लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार गट) शशिकांत शिंदे यांचे कार्यकर्त्यांनी शक्तीप्रदर्शन करत जोरदार स्वागत केले. चव्हाण साहेबांचा आणि पवार साहेबांचा सातारा जिल्हा अबाधित राहील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
सातारा लोकसभा मतदार संघातून अखेर महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून आमदार शशिकांत शिंदे यांची उमेदवारी जाहीर झाली .सातारा सीमेवर त्यांचे कार्यकर्त्यांकडून स्वागत करण्यात आले यावेळी बोलताना ते म्हणाले की, शाहू फुले आंबेडकर विचाराच्या सातारा जिल्ह्यामध्ये पुरोगामी विचारांची सातत्याने पाठराखण केलेली आहे . यावेळी माझ्या सारख्या कार्यकर्त्याला संधी दिली आहे. प्रथमतः साताऱ्यात प्रवेश होत असताना हा उत्साह तरुण आणि सामान्य जनतेचा आहे या उत्साहाचे प्रतीक एकच आहे की या लोकांच्या मनामध्ये जे आहे ते आपल्याला उस्पूर्तपणे पाहायला मिळत आहे. या सर्वांच्या माध्यमातून सातारा जिल्हा पुन्हा इतिहास घडवेल चव्हाण साहेबांचा आणि पवार साहेबांचा सातारा जिल्हा अबाधित राहील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
त्यानंतर शिंदे यांच्या वाहनांचा ताफा शिंदेवाडीपासून पुढे सातारच्या दिशेने मार्गस्थ झाला. हजारोंच्या उपस्थितीत शशिकांत शिंदे यांचे स्वागत झाले. या शक्ती प्रदर्शनामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य निर्माण झाले आहे.